#स्पर्धापरीक्षा - गुगल प्रोजेक्ट लून

टीम ई सकाळ
शनिवार, 27 मे 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 
http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरवण्याच्या हेतुने गुगल X या कंपनीच्या प्रोजेक्ट लून (Project Loon) ची सुरुवात दि. 18 फेब्रुवारी 2016 रोजी श्रीलंकेतील पुरेसा परिसरात हेलियम भरलेले फुगे हवेत सोडून केली गेली. 

काय आहे प्रोजेक्ट लून?

 • प्रोजेक्ट लून (Project Loon) मध्ये गुगल कंपनी 18 ते 25 किलोमीटर उंचीवर जाऊ शकतील असे हेलियम भरलेले फुगे आसमंतात सोडते. 
 • या फुग्यांमार्फत वायरलेस सिग्नल सोडले जातात. प्रत्येक फुगा त्याच्या परिघाच्या 40 किमी क्षेत्रात वायरलेस ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. 
 • ही सुविधा डोंगराळ, वाळवंटी वा इतर दुर्गम भागातील जनतेसाठी उपयुक्त ठरेल. 
 • या प्रकल्पाअंतर्गत गुगल कंपनी स्वस्त दरात डेटा कव्हरेज पाठवण्याचे वचन देते. 

प्रोजेक्ट लूनचा इतिहास व घटनाक्रम 
2008 साली गुगलने दक्षिण अमेरिकेतील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी बलूनच्या सहाय्याने हवेत बेस स्टेशन (Base Station) सोडणाऱ्या स्पेस डाटा कॉर्पोरेशन (Space Data Corp)शी करार करायचे ठरवले होते; परंतु करार करण्यात आला नाही.2011 साली गुगल X या कंपनी बरोबर गुगलने प्रोजेक्ट लूनवर काम करायला सुरुवात केली. 

 • जून 2013 मध्ये "प्रोजेक्ट लून' ची औपचारिक घोषणा करण्यात आली. 
 • 16 जून 2013 ला गुगलने न्यूझीलंडमध्ये 30 बलून सोडून या प्रकल्पासाठी प्रयोग केला आणि त्यात यश आले. 
 • नंतर गुगलने जगभरात असे 300 बलून सोडण्याचे ठरवले. 
 • मे - जून 2014 मध्ये असाच बलूनचा प्रयोग ब्राझील येथे झाला. 
 • 28 जुलै 2015 ला गुगलने श्रीलंकेच्या सरकारबरोबर करार केला. 
 • 18 फेब्रुवारी 2016 रोजी श्रीलंकेत हेलियम भरलेले फुगे हवेत सोडून प्रोजेक्ट लूनची सुरुवात केली गेली. 

भव्य फुगा (Giant Balloon) 

 • उत्पादक कंपनी रेवन एरोस्टार (Raven Aerostar)
 • हा भव्य फुगा 0.7 मि.मी. जाडीच्या पॉलिथीनपासून बनलेला आहे. 
 • फुग्याच्या तळाशी एक चौकोनी डबा आहे, ज्याद्वारे संवेदन (Signal) सोडले वा मिळवले जातात. 
 • हा फुगा सौरऊर्जेवर काम करतो. 
 • जगात अजूनही 60% लोक इंटरनेटच्या सुविधेपासून वंचित आहेत. शिवाय दुर्गम भागातील 4.3 अब्ज जनतेपर्यंत इंटरनेटचे टॉवर उभारणे कठीण असल्याचे दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे आहे. जवळपास 100 दिवस हा फुगा स्थितांबरात राहू शकतो. 
 • भारतामध्ये प्रोजेक्ट लूनची सुविधा देण्याची परवानगी मिळावी म्हणून "गुगल' प्रयत्न करत आहे. 
Web Title: Sakal News esakal news competitive exam news series upsc mpsc Google Project Loon