#स्पर्धापरीक्षा - अलिप्ततावादी चळवळीविषयी 

टीम ई सकाळ
सोमवार, 29 मे 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 
http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत संघ या महासत्तांच्या नेतृत्वाखालील परस्परविरोधी विचारसरणींवर निष्ठा असलेले दोन गट अस्तित्वात आले होते. सोव्हिएत संघाच्या नेतृत्वाखालील साम्यवादी देशांचा गट आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील भांडवलवादी पाश्‍चात्य देशांचा गट असे त्यांचे स्वरुप होते. 

 • त्यांच्यातील सत्तास्पर्धेने शीतयुद्धाला सुरुवात झाली होती. या पार्श्‍वभूमीवर वसाहतवादापासून स्वतंत्र होत असलेल्या राष्ट्रांना या सत्तास्पर्धेपासून दूर राहून शांततामय परिस्थितीत स्वतःचा विकास करावा असे वाटत होते, या राष्ट्रांनी पुढे आंतरराष्ट्रीय राजकारणात तिसरा गट आणला तो म्हणजे अलिप्ततावादी चळवळ. 
 • या चळवळीत प्रामुख्याने विकसनशील राष्ट्रांचा समावेश होत गेला. महासत्तांमधील स्पर्धेत सामील न होता त्यांच्याशी चांगले संबंध ठेवावेत आणि त्यांच्या सहकार्याने आपला विकास साधावा हा या संकल्पनेचा मुख्य आधार होता. 
 • आंतरराष्ट्रीय शांततेचे रक्षण हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश आहे आणि म्हणूनच आम्ही अलिप्ततेचे धोरण स्वीकारले आहे, असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1954 मध्ये कोलंबो येथे जाहीर केले. 
 • पुढे 1955 मध्ये बांडूग येथे झालेल्या आफ्रो आशियाई देशांच्या परिषदेपासून अलिप्ततावादाच्या विचाराने मूर्तरूप धारण केले आणि सप्टेंबर 1961 मध्ये चळवळीची स्थापना झाली. 
 • सध्या अलिप्त राष्ट्र गटात एकूण 120 सदस्य देश आहेत आणि 17 देश निरीक्षक म्हणून सहभागी आहेत. 

अलिप्त राष्ट्र चळवळीचे उद्देश  

 • विकसनशील राष्ट्रांवरील वसाहतवादाचा प्रभाव नाहीसा करून त्यांचा स्वयंनिर्णयाचा हक्क अबाधित राखणे 
 • प्रत्येक देशाच्या प्रादेशिक एकात्मतेचा सन्मान करणे 
 • लष्करी गटांमध्ये किंवा सत्ता स्पर्धेत सामील न होणे 
 • वसाहतवाद, साम्राज्यवाद, वांशिक भेदभावाला विरोध करणे 
 • आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बळाचा वापर करण्यास विरोध करणे 
 • संयुक्त राष्ट्र संघटनेला बळकट करण्यास सहाय्य करणे 

अलिप्त राष्ट्र चळवळीचे महत्व 
विकसनशील राष्ट्रे आणि प्रामुख्याने दक्षिणेकडील राष्ट्रांना आपले हितसंबंध जपण्यासाठी आणि आपली बाजू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रभावीपणे मांडण्यासाठी अलिप्ततावादी चळवळीचा लाभ होत आहे. 

 • भारताला पाकिस्तानविरोधी आणि दहशतवादविरोधी आपला मुद्दा ठोसपणे मांडण्यासाठी अलिप्ततावादी चळवळीचा लाभ होत आहे. 
 • अलिप्ततावादी चळवळीमुळे सदस्य देश त्यांच्यावर येणारा जागतिकीकरणाचा दबाव झुगारून देण्यात यशस्वी होत आहेत. 
 • जागतिकीकरणाच्या रेट्यात विकसित राष्ट्रांनी विकसनशील राष्ट्रांमधील नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग आपल्या विकासासाठी सुरू केला. विविध करारांच्या माध्यमातून तिसऱ्या जगातील राष्ट्रांवर आर्थिक वर्चस्व स्थापण्याचे आणि त्यातून राजकीय प्रभाव पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. अशा परिस्थितीत अलिप्ततावादाने त्यांना आधार दिला 
 • असे असले तरी आता शीतयुद्ध संपले आहे आणि अमेरिका जगाची महासत्ता बनला असल्याने आता अलिप्ततावादी चळवळीची गरज नाही, त्यामुळे ती संपवावी असाही एक मतप्रवाह भारतात आहे. 

 

Web Title: sakal news esakal news competitive exam news series upsc mpsc Non Alignment Movement