#स्पर्धापरीक्षा - रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016

टीम ई सकाळ
रविवार, 28 मे 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 
http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

क्रीडाविश्‍वातील सर्वात मोठ्या 31 व्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेला दि. 5 ऑगस्ट 2016 रोजी रिओ-दी-जानेरो (Rio-de-Janeiro) येथील ऐतिहासिक मराकाना (Marcana) स्टेडियमवर सुरुवात झाली व दि. 21 ऑगस्ट 2016 रोजी या क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. ऑलिंपिक स्पर्धा दक्षिण अमेरिकेत होण्याची ही पहिलीच वेळ होती. या ऑलिंपिक स्पर्धेत निर्वासितांच्या संघाचा ऑलिम्पिक समितीच्या ध्वजाखाली सहभाग होता. 

उद्‌घाटन सोहळा 
ब्राझीलचे प्रभारी राष्ट्राध्यक्ष मायकल टेमेर (Michel Temer) यांनी स्पर्धेची सुरुवात झाल्याची घोषणा केली. 

 • उद्‌घाटन सोहळ्यात भारताच्या 120 खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्व ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने केले. हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक होते. 
 • या ऑलिंपिकमधून पृथ्वीचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला. प्रत्येक देशाच्या पथकाला संचलनासाठी घेऊन येणाऱ्या मुलांच्या हातात एक-एक रोपटे देण्यात आले होते. त्याचबरोबर विविध प्रकारची रोपटी व देशाची पाटी असणारा प्रतिनिधी सायकलवरून सर्वात पुढे होता. 
 • अथेन्स ऑलिंपिक ब्रांझपदक विजेता मॅरेथॉनपटू वेंडेर्लेई-डी-लिमा (Vanderlei-de-Lima) याला ऑलिंपिक ज्योत प्रज्ज्वलित करण्याचा मान मिळाला. 
 • मूकबधिर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उद्‌घाटन सोहळ्यात सहभाग नोंदवला. 'फ्लिपर्स' (Flipers) असे टोपण नाव असलेल्या 20 विद्यार्थ्यांच्या चमूने 207 देशांच्या चमूला उद्‌घाटन सोहळ्यात साथ दिली. 
 • या ऑलिंपिक उद्‌घाटन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख (Thomas Bakh), संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून (Ban Ki Moon) उपस्थित होते. 

रिओ ऑलिंपिक 2016 

 • यजमान शहर : रिओ-दी-जानेरो 
 • देश : ब्राझील 
 • कालावधी : 5 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2016
 • ब्रीदवाक्‍य : A New World (अ न्यू वर्ल्ड) 
 • सहभागी देश: 206
 • पहिल्यांदाच सहभागी झालेले देश: कोसोव्हो आणि दक्षिण सुदान 
 • एकूण क्रीडा प्रकार: 306 (28 खेळांमधील)
 • एकूण सहभागी खेळाडू: 11,303
 • सर्वाधिक पदके जिंकणारा देश: अमेरिका (121) 
 • पदकतक्‍त्यात भारताचे स्थान: 66 वे 

रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारताची कामगिरी 

साक्षी मलिकला कांस्यपदक

दि. 17 ऑगस्ट 2016 रोजी रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून देण्याचा पराक्रम महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने केला. 

 • फ्री स्टाईल कुस्तीच्या 58 किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत किर्गिझस्तानच्या आयसुलु टिनीबेकोव्हा ला नमवत भारताला पदक मिळवून दिले. 
 • उपउपांत्यफेरीत साक्षीला रशियाच्या कोब्लोवा झोलोबोवा (Koblova Zholobova) कडून 9-2 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. मात्र, साक्षीही रेपेचेज (Repechage) द्वारे कांस्यपदकाची दावेदार ठरली व तिला आयसुलू टिनीबेकोव्हाशी (Aisuluu tynybekova) खेळण्याची संधी मिळाली. 
 • रेपेचेज हा कुस्तीतील एक नियम आहे. या नियमानुसार उपउपांत्यफेरीत ज्या मल्लाकडून पराभव झाला, तो मल्ल अंतिम फेरी गाठत असेल तर उपउपांत्यफेरीमध्ये पराभूत झालेल्या मल्लाला कांस्यपदकाच्या लढतीत खेळण्याची संधी मिळते. साक्षीला याच नियमाचा फायदा झाला. 
 • साक्षीचे पदक हे भारताचे कुस्तीतले पाचवे पदक, तर महिला कुस्तीतले पहिले ऑलिंपिक पदक ठरले. 
 • 1952 मध्ये हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीतले पहिले पदक (कांस्यपदक) मिळविले होते. 

महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला रौप्यपदक 
पी. व्ही. सिंधूला महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जगज्जेत्या व अव्वल मानांकित स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून 21-19, 12-21, 15-21 असे पराभूत व्हावे लागल्याने तिला दि. 20 ऑगस्ट 2016 रोजी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

 • बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक पटकावणारी सिंधू ही पहिलीच भारतीय आहे. ऑलिंपिक पदक मिळविणारी 21 वर्षीय सिंधू ही सर्वात तरुण खेळाडू आहे. 
 • 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये सायना नेहवालने कांस्यपदक जिंकले होते. 
 • ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी सिंधू ही पाचवी भारतीय महिला ठरली. यापूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी, मेरी कोम, सायना नेहवाल आणि साक्षी मलिक यांनी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. 
 • सिंधूने मिळविलेले रौप्यपदक हे भारताचे ऑलिंपिक इतिहासातील एकूण चौथे वैयक्तिक रौप्यपदक आहे. यापूर्वी राजवर्धनसिंग राठोड (अथेन्स 2014), विजय कुमार (लंडन 2012) आणि मल्ल सुशील कुमार (लंडन 2012) यांनी तीन रौप्यपदके देशाला मिळवून दिली आहेत. 
 • सिंधूचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या शिष्याचे हे दुसरे पदक आहे. लंडन ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालच्या यशात व आता पी. व्ही. सिंधूच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal news esakal news competitive exam news series upsc mpsc Rio Olympic