"सकाळ'च्या वाचकसंख्येत 13.43 लाखांची वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 एप्रिल 2019

 इंडियन रीडरशिप सर्व्हेच्या (आयआरएस) यंदाच्या अहवालानुसार "सकाळ'च्या वाचकसंख्येत 13 लाख 43 हजारांची दणदणीत वाढ झाली आहे. "सकाळ'चे वाचक एक कोटी 18 लाख 41 हजार आहेत.

इंडियन रीडरशिप सर्व्हे ः देशात वर्तमानपत्रांचे वाचक वाढले 
मुंबई -  इंडियन रीडरशिप सर्व्हेच्या (आयआरएस) यंदाच्या अहवालानुसार "सकाळ'च्या वाचकसंख्येत 13 लाख 43 हजारांची दणदणीत वाढ झाली आहे. "सकाळ'चे वाचक एक कोटी 18 लाख 41 हजार आहेत. यापूर्वी ऑडिट ब्युरो सर्क्‍युलेशनच्या नुकत्याच जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील मराठी दैनिकांच्या खपात "सकाळ' पहिल्या स्थानावर असून, "सकाळ'चा खप 12 लाख 92 हजार इतका नोंदवला होता. त्यानंतर आता "आयआरएस'च्या आकडेवारीनेही "सकाळ'च्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब केले आहे. 

"आयआरएस'चा अहवाल आज मीडिया रिसर्च यूझर्स कौन्सिलतर्फे येथे जाहीर करण्यात आला. देशातील वर्तमानपत्रांच्या व नियतकालिकांच्या वाचकसंख्येत वाढ होत असून, त्यांची एकत्रित वाचकसंख्या 42 कोटी 50 लाख झाली आहे. दोन वर्षांपूर्वी ही संख्या 40 कोटी 70 लाख होती. आयआरएसच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष विक्रम सखुजा व मीडिया रिसर्चचे अध्यक्ष आशिष भसीन यांनी आज येथे ही माहिती पत्रकारांना दिली. देशातील एकूण वाचकसंख्या 1 कोटी 80 लाखांनी वाढली. आयआरएसच्या मागच्या सर्वेक्षणानुसार "सकाळ'ची वाचकसंख्या एक कोटी चार लाख 98 हजार होती, ती या वर्षी एक कोटी 18 लाख 41 हजार झाली आहे. विशेष म्हणजे देशातील इंग्रजीसह सर्व भाषांमधील पहिल्या वीस (टॉप ट्‌वेंटी) दैनिकांमध्ये "सकाळ'चा समावेश आहे, तर इंग्रजी वगळून देशातील अन्य भाषिक वर्तमानपत्रांच्या पहिल्या दहा (टॉप टेन) दैनिकांत "सकाळ'चा समावेश आहे. 

या सर्वेक्षणानुसार देशातील नियतकालिकांच्या वाचकसंख्येतही वाढ झाली असून, दोन वर्षांत त्यांचे वाचक सात कोटी 80 लाखांवरून आठ कोटी 70 लाखांपर्यंत गेली आहे. नियतकालिकांचे वाचक ग्रामीण विभागापेक्षा नागरी विभागात जास्त असून, तेथे त्यांचे वाचक साडेचार कोटींवरून चार कोटी 90 लाखांवर गेले आहेत. 

"सकाळ साप्ताहिक'च्या वाचकसंख्येत भरीव वाढ 
"सकाळ'प्रमाणेच "सकाळ साप्तहिक'नेही वाचकसंख्येत भरीव वाढ नोंदवली आहे. महाराष्ट्रातील नामवंत मराठी नियतकालिक असलेल्या "सकाळ साप्ताहिक'ची वाचकसंख्याही पाच लाख पाच हजारांवरून पाच लाख 52 हजार एवढी वाढली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Newspaper number one in Indian Readership Survey 13.43 lakhs readers increased