esakal | रुग्णालयानं जोडला जनतेशी अतूट भावबंध

बोलून बातमी शोधा

Sane Guruji Hospital Kinwat
रुग्णालयानं जोडला जनतेशी अतूट भावबंध
sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

"सकाळ सोशल फाउंडेशन" च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी "सोशल फॉर अॅक्शन" हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. या वेबसाईटला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्थां व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी "सोशल फॉर अॅक्शन" क्राउड फंडींगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाईल. आजच्या भागात "भारत जोडो युवा अकादमी" या संस्थेची माहिती पाहणार आहोत.

"भारत जोडो युवा अकादमी" या स्वयंसेवी संस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील किनवट सारख्या आदिवासी, बंजारा -बहुल भागात आरोग्य सेवा पुरविणारे साने गुरुजी रुग्णालय आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट हा मोठा तालुका आहे. तालुक्याला घनदाट जंगल लाभले आहे. महाराष्ट्रातील अनेक दुर्गम भागात आजही आरोग्याच्या सोयी - सुविधांची कमतरता प्रकर्षाने जाणवते. किनवट सारख्या भागात पंचवीस वर्षांपूर्वी आरोग्याचा प्रश्न बिकट होता. त्यावेळी थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून डॉ. अशोक बेलखोडे यांनी १९९५ साली साने गुरुजी रुग्णालय उभे केले.

"भारत जोडो युवा अकादमी" ही संस्था पंचवीस वर्षांपूर्वी "भारत जोडो सायकल अभियान"व सोमनाथ श्रमसंस्कार छावणीत सहभागी होणाऱ्या तरुण – तरूणींनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे. डॉ. अशोक बेलखोडे हे या संस्थेचे प्रमुख आहेत. ते मूळचे नागपूरचे , औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एम. एस. जनरल सर्जरी ही पदवी त्यांनी मिळविली आहे. डॉ. अशोक बेलखोडे १९८५ व १९८९ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर व इटानगर ते ओखा या बाबा आमटे यांच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठीच्या "भारत जोडो "सायकल यात्रेत सहभागी झाले होते. बाबा आमटे हे त्यांचे प्रेरणास्थान त्यांच्या मार्गदर्शनामुळेच किनवट सारख्या आदिवासी भागासाठी काम करण्याचे डॉ. अशोक बेलखोडे यांनी ठरविले.

साने गुरुजी रुग्णालयामुळे किनवट परिसरातील जवळपास चारशे गावांमधील रुग्णांना अगदी प्राथमिक पण आधुनिक वैद्यकीय उपचार मिळू लागले. अगदी सुरूवातीपासूनच पॅथॉलॉजी लॅब, एक्स – रे, सोबतच ऑपरेशनची सोय असलेले आणि सर्व प्रकारचे तातडीने उपचार करणारे पुर्णवेळ कार्यरत असे रूग्णालय मिळाले.हे या परिसरातील पहिले अशासकीय रूग्णालय व डॉ. अशोक बेलखोडे हे पुर्णवेळ काम करणारे पहिले सर्जन व तसे पाहता आताही एकमेवच.

साने गुरुजी रुग्णालया आता पंचविस बेड्स आहेत, तसेच रुग्णालयाला दोनरुग्णवाहिका (पैकी एक कार्डियाक) डायलिसिस युनिट आहे. रक्तसाठा केंद्र आहे, स्वतंत्र फिजिओथेरेपी, डेंटल युनिट आहे. डॉ. अशोक बेलखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात रुग्णांची नीट तपासणी , त्यांच्या विविध चाचण्या , गरज पडल्यास शस्त्रक्रिया या गोष्टी किनवट परिसरात पहिल्यांदाच सुरु झाल्या. एक फिरत्या दवाखानाही आहे तो दररोज चार –पाच दुर्गम गावांना आरोग्यसेवा तेथे जाऊन देतो.

आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा , विदर्भ भागातील रुग्णांबरोबरच तेलंगणा राज्यातील मिळून सुमारे चारशे गावांमधील लाखो लोकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये पन्नास टक्के आदिवासी लोकांचे प्रमाण आहे. प्रत्येक वर्षी साधारणपणे दहा हजार रुग्ण रुग्णालयाचा लाभ घेतात. रुग्णालयात जवळपास आतापर्यंत सात हजार च्या आसपास यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात तातडीने (इमर्जन्सी) उपचार केलेल्या रुग्णांची संख्या फार मोठी आहे. या आरोग्य सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचविता आले आहे. त्यामुळेच साने गुरूजी रूग्णालय हे या परिसरातील लोकांसाठी “जीवनदायी” केंद्र बनले आहे. रुग्णालयाच्या वतीने कुटुंबकल्याण कार्यक्रम, किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण शिबिरे , गरोदर महिला स्तनदा माता व कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येत असते.

डॉ. बेलखोडे यांचे कुटुंब कल्याण कार्यक्रमातील योगदान खूप मोठे आहे. त्यांनी आतापर्यंत सात - आठ जिल्ह्यातुन कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या आहेत. हा आकडा आता नव्वद हजाराच्या वर गेलेला आहे. त्यासाठी त्यांनी जवळपास दोन लाख किलोमीटर प्रवासही केला आहे. रात्री - अपरात्री आदिवासी, गरीब रुग्ण व प्रसूतीसाठी महिला मैलो न मैल प्रवास करून , वेळप्रसंगी चालत उपचारांकरीता साने गुरुजी रुग्णालयात येतात. अशावेळेस डॉ. अशोक बेलखोडे सर्व प्रथम रुग्णाच्या सेवेसाठी हजार असतात. किनवट परिसरात आजही कच्चे रस्ते आहेत, तसेच वाहतूक आणि दळणवळणाची फारशी साधने या भागात पोहोचली नाहीत. सर्व रुग्णांवर साने गुरुजी रुग्णालयात अगदी माफक दरात उपचार करण्यात येतात. किनवट येथे काम सुरू करतांना डॉ. अशोक बेलखोडे यांनी बाबा आमटे यांना कितीही अडचणी आल्या तरी किनवट सोडणार नाही.असे वचन दिले होते. ओघानेच शेवटपर्यंत या भागातील आदिवासी व गरीब रुग्णांची ते सेवा करीत राहणार आहेत. बाबा आमटे यांच्याकडून घेतलेला रुग्णसेवेचा वसा डॉ. अशोक बेलखोडे साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून पुढे चालवत आहे.

साने गुरूजी रूग्णालय व इतर आरोग्य प्रकल्प हा भारत जोडो युवा अकादमी या संस्थेच्या कामाचा प्रमुख भाग असला तरी सोबतच या परिसरात विज्ञान (तालुका विज्ञान केंद्र, मविप, अनिंस), शिक्षण (साने गुरूजी इंग्लीश स्कुल दोन ठिकाणी, साने गुरूजी चित्रकला महाविद्यालय, साने गुरूजी वरीष्ठ कला महाविद्यालय इस्लापूर, रूग्णसहायीका प्रशिक्षण), महिला, लहान मुले (राष्ट्र सेवा दल शिबीरे, कथामाला) युवा विकास (राष्ट्रीय एकात्मता शिबीरे, रक्तदान शिबीरे, संवाद व प्रबोधन शिबीरे) सांस्कृतीक (व्याख्यानमाला, लोककला, लोकनृत्य, संगीत महोत्सव इ.)जलसंधारण, दुष्काळ व आपत्ती निवारण इत्यादी क्षेत्रात मोलाचे कार्य करून विशेष ठसा उमटविला आहे.

भारत जोडो युवा अकादमी संस्थेने या परिसरातील मागील पंचविस वर्षाचा अनुभव घेत या परिसरातील आरोग्य विषयक उणीवा व गरजा लक्षात घेऊन “साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल” हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. एका बाजूला वैद्यकीय तंत्रज्ञान आकाशाला गवसणी घालते आहे पण हे सर्व तंत्रज्ञान शहरातच अडकून पडले आहे त्याचा लाभ किनवट परिसरातील गरजू, गरीब व वंचीत जनतेला मिळायला हवा या उद्देशाने या प्रकल्पाची उभारणी करण्याचे डॉ. अशोक बेलखोडे व त्यांचे संस्थेतील व परिवारातील सर्व सहकाऱ्यांनी ठरविले आहे. या शंभर बेड्सच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्याचे बांधकाम सुरू झाले असुन त्याचे उद्घाटन डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते झाले आहे.

साने गुरुजी रुग्णालय हे समाजातील दानशूर व्यक्तींच्या देणगीवर उभे आहे. त्यासाठी गरज आहे सामूहिक मदतीची !

"भारत जोडो युवा अकादमी" या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. रुग्णांच्या आरोग्य तपासणी व औषध- उपचारांचा व शस्त्रक्रियांचा खर्च मोठा आहे. संस्थेला सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या "सोशल फॉर अॅक्शन" या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर "भारत जोडो युवा अकादमी" च्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती , माहिती -तंत्रज्ञान कंपन्या , सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन "भारत जोडो युवा अकादमी" या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या साने गुरुजी रुग्णालयाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व 80 जी हे प्राप्तिकरात 50 टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.