विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

कोरेगाव भीमा - पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवरांसह आंबेडकरी बांधवांनी रविवारी दिवसभर गर्दी केली होती. विविध पक्ष, संघटनांनी अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभास मानवंदना दिली. 

कोरेगाव भीमा - पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवरांसह आंबेडकरी बांधवांनी रविवारी दिवसभर गर्दी केली होती. विविध पक्ष, संघटनांनी अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभास मानवंदना दिली. 

पेरणे फाटा येथे शनिवारी रात्रीपासूनच विविध कार्यक्रमास सुरवात झाली. रविवारी सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, प्रा. जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, विलास गरुड, प्रदीप कंद, ऍड. भाई विवेक चव्हाण, लता शिरसाट, तृप्ती देसाई, तसेच भीमशक्ती, सामाजिक विकास संघटना, बहुजन सुरक्षा गट, झोपडपट्टी सुरक्षा दल, भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा संघ, बुद्धीस्ट मूव्हमेंट सेंटर ट्रस्ट, फुले-शाहू आंबेडकर विचार मंच आदींसह विविध संस्था व पक्षसंघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. 

गतवर्षीपासून भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतलेल्या "एक स्तंभ, एक व्यासपीठ' या संकल्पनेला दोन गट वगळता सर्वांनी प्रतिसाद दिला, तर 2018 मध्ये येथील लढाईला 200 वर्षे पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील जमीन व रस्त्यासह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. समाजाच्या एकजुटीसाठी प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे, असे आठवले यांनी सांगितले. या वेळी कवाडे, आनंदराज आंबेडकर यांचे भाषण झाले. 

जिल्हा परिषद व पेरणे ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरते शौचालयाची व्यवस्था केल्याचे सरपंच सुनीता लोंढे, उपसरपंच नीलेश वाळके व ग्रामविकास अधिकारी लांडगे यांनी सांगितले. अनेक संघटनांनी या ठिकाणी विजय ज्योतीही आणल्या होत्या. सर्जेराव वाघमारे यांनी स्वागत केले. 

पुणे-नगर रस्त्यावर गर्दीमुळे चारही बाजूंनी येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती. लोणीकंदचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील व शिक्रापूरचे रमेश गलांडे यांनी दोन्ही बाजूंनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तरीही सायंकाळी पुण्याच्या बाजूने वाहनांची कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. 

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना 
मानवंदना देण्यासाठी आलेल्या आंबेडकरी बांधवांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी कोरेगाव भीमा तसेच पेरणे टोलनाका अशा दोन्ही बाजूंनी व्यवस्था केली होती. वाहतूक नियोजन व बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन उपविभागीय अधिकारी, दोनशे कर्मचारी व शंभर होमगार्ड तसेच शीघ्र कृतिदलाचे जवान तैनात केले होते. 

Web Title: To salute the crowd vijaystambh