भिडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय - ऍड. आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

नगर - संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ समजणाऱ्या संभाजी भिडे यांची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचेच अभय असल्याशिवाय ते असे बेताल वक्‍तव्य करणार नाहीत. भिडे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दंगल घडविण्याचा अजेंडा दिला आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

आंबेडकर म्हणाले, 'संघ व भागवत संप्रदाय या दोन वेगळ्या विचारधारा आहेत. भागवत संप्रदायातील संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज यांनी माणुसकी टिकविण्यासाठी प्रयत्न केले. दोन समाजांमध्ये दंगल घडविण्याचा संघ व भाजप प्रयत्न करत आहे. दंगल घडवून सत्तेत यायचे हा त्यांचा फंडा आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन देऊनही कोरेगाव भीमा प्रकरणाची अपेक्षित चौकशी झाली नाही, तशीच या प्रकरणातही चौकशी होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनाबाबत विधानसभेत विरोधी पक्ष स्वतःला वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत नाहीत.''

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला मारण्याचा प्रयत्न झाल्याचे खोटे सांगतात. केंद्र सरकार नाटक करते. पंतप्रधानांच्या विरोधात टीका-टिप्पणी झाल्यास कारवाई करण्यात येते. चुकीच्या गोष्टींवर टीका करणे, हा संविधानाने दिलेला हक्‍क आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांवर कारवाई होऊ नये, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

आघाडीसाठी कॉंग्रेसला प्रस्ताव
वंचित बहुजन आघाडी धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेण्यास तयार आहे. कॉंग्रेसला आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष मानतो. त्यामुळे कॉंग्रेसला एक प्रस्ताव देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात धनगर, माळी, तळाचे ओबीसी, भटके-विमुक्‍त, मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी 12 जागा द्याव्यात आणि उर्वरित जागा कॉंग्रेसने लढवाव्यात, असे या प्रस्तावात म्हटले आहे, अशी माहिती ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

Web Title: sambhaji bhide chief minister prakash ambedkar politics