Sambhaji Bhide: संभाजी भिडेंना टिकलीसंबधी वक्तव्य भोवणार? राज्य महिला आयोगाचं पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Bhide

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंना टिकलीसंबधी वक्तव्य भोवणार? राज्य महिला आयोगाचं पत्र

कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. संभाजी भिडे हे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेले होते. यावेळी साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी भिडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी भिडे यांना थांबवले असता वादग्रस्त वक्तव्य करत भिडेंनी काढता पाय घेतला.

रुपाली बडवे या महिला पत्रकाराने भिडेंना थांबवले असता ते म्हणाले, 'आमची अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो', असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.

हेही वाचा: Sambhaji Bhide: 'भिडेंच्या डोक्यात स्त्री द्वेषाचे किडे!'; संभाजी भिडेंच्या 'त्या' विधानावर कॉंग्रेसची टीका

संभाजी भिडेंना हे वक्तव्य आता चांगलंच भोवणार असल्याचं दिसून येते आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांनी आपल्या भूमिकेचा तात्काळ खुलासा करावा असे सांगण्यात आले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला का? स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे, असे आयोगाने म्हटंले आहे.

भिडे यांच्या वक्तव्याबाबत समाजातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतलीय. तरी कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकारांशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार तात्काळ सादर करावा, अशी नोटीस महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना देण्यात आली आहे.

हेही वाचा: Sambhaji Bhide : भिडेंची आतापर्यंतची वादग्रस्त विधानं कोणती?