'उद्धवा... अखेर तुझेच सरकार!'

संभाजी पाटील
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

उद्धव ठाकरे हे संयत आणि संयमी व्यक्तिमत्त्व आहे. राज्य एका संक्रमणावस्थेतून जात आहे. मंदी, दुष्काळ आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामुळे राज्याचे कंबरडे मोडले आहे. कामगार कपातीपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपर्यंत अनेक आव्हाने ठाकरे यांच्यासमोर राहणार आहेत.

'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्‍वर साक्ष शपथ घेतो की...' 
संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात शिवाजी पार्क मैदानावर घुमलेला हा आवाज महाराष्ट्राच्या राजकारणातील पक्षापक्षांमधील अस्पृश्‍यता दूर करून नव्या सत्तासमीकरणांची नांदी ठरला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाने यापुढे 'हा' पक्ष 'त्या' पक्षासोबत युती किंवा आघाडी करू शकणार नाही, या 'वैचारिक' सीमारेषाही या आवाजाने पुसून टाकल्या. महिनाभराच्या अथक संघर्षानंतर, शरद पवार या सरसेनानीच्या चाण्यकनितीखाली लढलेल्या लढायांना अखेर यश आले. आता खरी लढाई असेल ती महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची! 

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा. भाजपसोबत युती करून 1995 मध्ये शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी शपथ घेतली. याच सत्ताकाळात नारायण राणे यांनाही मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. त्यानंतर शिवसेनेला बऱ्या-वाईट दिवसांचा सामना करावा लागला. 1999 पासूनच राज्यात सेनेचा पुन्हा मुख्यमंत्री व्हावा अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती. बाळासाहेबांनी आपल्या अखेरच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदी बसावे, अशीही इच्छा व्यक्त केली होती. 

बाळासाहेबांचा वारस कोण? यावरून राज आणि उद्धव यांच्यात झालेला संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव यांनी अत्यंत जोमाने शिवसेनेचा किल्ला एकहाती लढविला. त्या प्रयत्नांना चांगले यशही आले. शिवसेना वाढली, मोठा भाऊ-छोटा भाऊ या संघर्षात पक्षाने आपले स्थान टिकवले. भाजपसोबत गेल्या पाच वर्षात नाइलाजाने का होईना राज्यात सत्ता उपभोगली आणि आज अत्यंत कठीण परिस्थितीत भाजपच्या तोंडचा सत्तेचा घास हिसकावून मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचे शिवधनुष्यही पेलले. 

- हिच ती वेळ! मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...

विधानसभेचा निकाल लागल्यापासून सतत काहीतरी धक्कादायक घटनांची जंत्री देणारा हा महिना राज्यातील इतिहासालाही वेगळी दिशा देणारा ठरला. 'आमचं ठरलयं' असे म्हणत यावेळी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मुख्यमंत्रिपदाची आपली इच्छा उघड केली. ठाकरे आता सत्तापदांपासून दूर राहणार नाहीत, हे त्याचवेळी स्पष्ट झाले.

लोकसभेच्या अडचणीच्या काळात शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला गेल्याचे सांगण्यात आले. भाजपने असे काही ठरेलच नसल्याचे सांगत 54 आमदार असणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाकारणे सहाजिकच होते. पण या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे शरद पवार या अस्सल खेळाडूने असे काही डाव टाकले आणि त्यात भाजपच्या पाठीला कधी माती लागली हे कळलेही नाही. 

- उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर शेतकऱ्यांसाठी येणार गोड बातमी?

केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात एकहाती सत्ता येईल अशी अपेक्षा होती. शिवसेना नेहमीप्रमाणे ताणेल, पण तुटणार नाही शक्‍यता खात्री भाजपलाही होती. पण सत्तास्थापनेसाठी लागणारा 145 हा जादुई आकडा अशा प्रकारे अडकून बसला की, त्यात कोणालाच काही करणे शक्‍य नव्हते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेला सोबत घेऊन तोही शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, याचा पुसटसाही अंदाज किंवा कल्पना कोणीही केली नाही, तिथेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी मिळाली आणि भाजपविरोधातील चीड व्यक्त करण्याची संधी मिळाली. शरद पवार यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर अजितदादांच्या बंडासह अत्यंत अवघड खिंड लढवली आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 

ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाने राजकारणाची आखीव-रेखीव चौकट मोडून टाकली. एखाद्याची 'जिरवायचीच' या भावनेतून कोणीही एकत्र येऊ शकते, सत्तास्थापन करू शकतात हे सिद्ध करण्यात यश आले. याला अपवाद कोणताही पक्ष नव्हता. शिवसेना, कॉंग्रेस आघाडीची 'महाविकास आघाडी' स्थापन होऊ शकते तसेच भाजपही अजित पवार यांना घेऊन सत्तास्थापनेचा डाव मांडू शकते हेही महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले. त्यामुळे आता तत्व आणि निष्ठेच्या गप्पा मारण्याचा अधिकार कोणालाही राहिला नाही. 

- शेतकऱ्यांना कर्जमाफीसह उद्योगांना चालना; वाचा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम

उद्धव ठाकरे हे संयत आणि संयमी व्यक्तिमत्त्व आहे. राज्य एका संक्रमणावस्थेतून जात आहे. मंदी, दुष्काळ आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामुळे राज्याचे कंबरडे मोडले आहे. कामगार कपातीपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपर्यंत अनेक आव्हाने ठाकरे यांच्यासमोर राहणार आहेत. सत्तेच्या खुर्चीवर असताना निर्णय घेणे आणि बाहेर असताना बोलणे यातील फरक त्यांना आता जाणवणार आहे.

दुसरीकडे कृत्रिमश्‍वासावर असणाऱ्या रुग्णाला संजीवनी मिळाल्याप्रमाणे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेचा लाभ झाला आहे. सत्ता नसतानाचे चटके त्यांनी सहन केले आहेत. त्यामुळे हे तीनही पक्ष आपल्या अनुभवाच्या जोरावर राज्याला एक नवी दिशा देतील अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचा राज्यातील हा प्रयोग यशस्वी झाला तर देशभरात प्रादेशिक पक्षांना पुन्हा एकदा नवी दिशा मिळेल, जी देशाच्या राजकारणाचीही नांदी ठरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Patil write an article about Maharashtra new CM Uddhav Thackeray