उसाच्या गाडीला पावती देणारा आज कॅबिनेट मंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

1995 मध्ये पहिलीच निवडणूक जिंकून भुमरे यांनी विधानसभेत पाहिले पाऊल ठेवले. त्यानंतर 2009 वगळता भुमरे यांनी पाचवेळा आमदार होण्याचा मान पटकावला. 

औरंगाबाद : साखर कारखान्यात येणाऱ्या उसाच्या गाडीचे वजन करून त्यांना पावत्या देणारा स्लिप बॉय पुढे त्या कारखान्याचा चेअरमन झाला. पण आज याच व्यक्तीने महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

संत एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आणि गोदावरीने समृद्ध केलेल्या पैठण विधानसभा मतदारसंघातुन पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांची उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे.

Image result for sandipan bhumare

पाचोडसारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्मलेल्या संदीपान भुमरे यांनी एसएससीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1982 मध्ये पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यात स्लिप बॉय म्हणून नोकरी केली. 1989 मध्ये ते राजकारणात सक्रीय झाले. पाचोडचे शिवसेना शाखाप्रमुख म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.

Related image

सहकार क्षेत्रात उडी

कालांतराने पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. राजकारणातील पहिलीच निवडणूक बिनविरोध जिंकून भुमरे यांनी आपल्या राजकीय भविष्यातील वाटचालीची झलक दाखवली होती. ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केल्यानंतर 92 ते 94 दरम्यान पाचोड पंचायत समिती उपसभापती पद त्यांनी भूषवले.

यांचाही प्रवास - मोलमजुरी, हमाली ते मंत्रिपद

राजकारणात दमदार वाटचाल करत संदीपान भुमरे यांनी सहकार क्षेत्रात देखील उडी घेतली. 1993 मध्ये ज्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लिप बॉय म्हणून काम केले त्याच कारखान्यात संचालक आणि 96 मध्ये चेअरमन झाले.

Image result for sandipan bhumare

पहिलीच निवडणूक जिंकून झाले आमदार

1995 मध्ये शिवसेनेने सर्वप्रथम भुमरे यांना पैठणमधून विधानसभेची उमेदवारी दिली. पहिलीच निवडणूक जिंकून भुमरे यांनी विधानसभेत पाहिले पाऊल ठेवले. त्यानंतर 2009 वगळता भुमरे यांनी पाचवेळा आमदार होण्याचा मान पटकावला. 

याशिवाय संत एकनाथ महाराज विस्वस्त मंडळाचे अध्यक्ष, विहामंडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून देखील भुमरे कार्यरत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandipan Bhumare Takes Oath As A Cabinet Minister Of Maharashtra Paithan Aurangabad Breaking News