संघर्ष यात्रा अधिक तीव्र होणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 मे 2017

मुंबई - भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्‍तव्याच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कर्जमुक्‍तीसाठी विरोधकांनी आयोजित केलेली संघर्ष यात्रा अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत. कोकणात सुरू होणाऱ्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला असून, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक होणार आहेत. 

मुंबई - भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्‍तव्याच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कर्जमुक्‍तीसाठी विरोधकांनी आयोजित केलेली संघर्ष यात्रा अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत. कोकणात सुरू होणाऱ्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला असून, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक होणार आहेत. 

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ संवैधानिक अधिकारांचा वापर करून लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना पोलिसी बळाचा वापर करून तुरुंगात डांबणे म्हणजे अघोषित आणीबाणीच असल्याची घणाघाती टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. सत्तेचा आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून सरकार आणि भाजपविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे पोलिसांकडून रीतसर परवानगी घेऊन उपोषण करणाऱ्या मानस पगार, हनुमंत पवार, शरद पवार, अक्षय पुराणिक, मयूर लाटे यांच्यासह इतर आंदोलनकर्त्यांना पोलिसी बळाचा वापर करून उपोषणस्थळावरून उचलून पोलिस ठाण्यात डांबण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता पोलिस काहीही माहिती द्यायला तयार नाहीत. संवैधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरीपुत्रांचे आंदोलन सत्तेचा आणि पोलिस बळाचा वापर करून चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यावरून भाजप सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे सुरू झाल्याचे दिसून येते, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले. अजित पवार हे भाजप आणि दानवे यांचा शेलक्‍या भाषेत समाचार घेतील, अशी चर्चा दोन्ही कॉंग्रेसमध्ये आहे. 

राणेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष 

संघर्ष यात्रेचा चौथा टप्पा येत्या 17 मे पासून कोकणात सुरू होत असून, त्याचा समारोप 18 मे रोजी होणार आहे. कोकणात सुरू होणाऱ्या संघर्ष यात्रेत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे सहभागी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघर्ष यात्रेसाठी राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. नितेश यांच्या सहभागामुळे राणे कुटुंबातील कॉंग्रेसबाबतच्या वावड्या शांत होतील, असे जाणकारांचे मत आहे. संघर्ष यात्रेची सुरवात 17 मे रोजी रायगडावर होईल. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातून ही यात्रा पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार असून, राणे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कणकवलीत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 18 मे रोजी यात्रेचा समारोप बांदा येथे जाहीर सभेने होईल. 

Web Title: sangharsh yatra