जीवनचरित्राची शिल्पसृष्टी बनली आकर्षण

शामराव गावडे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नवेखेड - सांगली जिल्ह्यातील वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मगावी व त्यांच्या राहत्या घरी तत्कालीन सरकारने उभारलेली त्यांच्या जीवनचरित्राची शिल्पसृष्टी महाराष्ट्रातील लोकांचे आकर्षण बनली आहे. वाटेगाव ग्रामपंचायत व अण्णा भाऊ साठे कुटुंबीयांकडून त्याची देखभाल केली जाते.

नवेखेड - सांगली जिल्ह्यातील वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मगावी व त्यांच्या राहत्या घरी तत्कालीन सरकारने उभारलेली त्यांच्या जीवनचरित्राची शिल्पसृष्टी महाराष्ट्रातील लोकांचे आकर्षण बनली आहे. वाटेगाव ग्रामपंचायत व अण्णा भाऊ साठे कुटुंबीयांकडून त्याची देखभाल केली जाते.

वाटेगावात जन्मलेल्या अण्णा भाऊंचे अल्पशिक्षण झाले. कुटुंब चालविण्यासाठी त्यांच्या वडिलांनी मुंबई गाठली. पायी २२७ मैलांचा प्रवास करून ते मुंबईला पोचले. त्या ठिकाणी चिरागनगर, घाटकोपर येथे पत्र्याच्या घरात राहून लोकशाहीर अण्णा भाऊंनी फकिरा, चित्रा या अजरामर कादंबऱ्या, काही कथासंग्रह लिहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईसह महाराष्ट्र या मराठी भाषिक राज्याची निर्मिती करण्यासाठी लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी पहाडी आवाजाने महाराष्ट्रभर फिरून जनजागरण केले. 

महाराष्ट्राला मोठे योगदान या साहित्यिकाने दिले. अवघे ५० वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांची व वारसाची मोठी परवड झाली. अण्णा भाऊ  साठे यांना मधुकर हा एकच मुलगा. तोही अकाली वारला. मधुकर यांची पत्नी म्हणजे अण्णा भाऊंची सून सावित्री पदरात चार मुली घेऊन वाटेगावात राहते. तीन मुलींचे विवाह झाले. १९९६-९७ मध्ये युती सरकारने शेणे रस्त्यालगत अण्णा भाऊ  साठे यांचा अर्धपुतळा व स्मारक उभारले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने २००८ मध्ये त्यांच्या राहत्या घराची डागडुजी केली. घराभोवतीच्या रिकाम्या जागेत शिल्पसृष्टी उभारली. त्यांचे बालपण, शालेय सवंगड्यांबरोबरचे जीवन, मुंबईतील जीवन, विवाह, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील जनजागरण, रशिया प्रवास असे विविध प्रसंग या शिल्पसृष्टीत साकारले. स्मारकाच्या मागील जागेत बहुजन समाज पक्षाच्या काशीराम व मायावती यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या वारसांना घर बांधून दिले. राज्यभरातील कार्यकर्ते या ठिकाणी येऊन त्यांचे चरित्र अभ्यासतात. ज्योत ठिकठिकाणी नेली जाते. भारतीय स्टेट बॅंकेत काही रक्‍कम ठेव स्वरूपात ठेवली आहे. प्रतिमहिना १४०० रुपये व्याज मिळते. त्यावर श्रीमती सावित्री साठे यांची व कुटुंबाची गुजराण चालते.

अण्णा भाऊंचे आम्ही वारसदार आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. बॅंकेतील व्याज व प्रसंगी मजुरी करून गुजराण सुरू आहे. कायमस्वरूपी उत्पन्नाचा वेगळा मार्ग मिळायला हवा.
- श्रीमती सावित्री साठे, अण्णा भाऊंची सून

Web Title: sangli news anna bhau sathe