जातपंचायतीमुळे कुटुंब दहा वर्षे वाळीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

तुंग - ग्रामस्वच्छता अभियानात राज्यभर लौकिक मिळवलेल्या तुंग (ता. मिरज) गावात नंदीवाले समाजातील जातपंचायतीने दडपशाहीतून एका कुटुंबाला तब्बल दहा वर्षे समाजातून बहिष्कृत केले. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात १३ पंचांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केलेल्या प्रयत्नामुळे हा प्रकार उघडकीस आला. जातपंचायतीविरोधी कायद्यानुसार दाखल झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा ठरला आहे.

तुंग - ग्रामस्वच्छता अभियानात राज्यभर लौकिक मिळवलेल्या तुंग (ता. मिरज) गावात नंदीवाले समाजातील जातपंचायतीने दडपशाहीतून एका कुटुंबाला तब्बल दहा वर्षे समाजातून बहिष्कृत केले. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात १३ पंचांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केलेल्या प्रयत्नामुळे हा प्रकार उघडकीस आला. जातपंचायतीविरोधी कायद्यानुसार दाखल झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा ठरला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात आणि तुंग येथील पांडुरंग तमाण्णा चौगुले यांनी पत्रकार परिषदेत या गंभीर प्रकाराची माहिती दिली. नंदीवाले समाजातील पांडुरंग चौगुले यांच्या कुटुंबाला गेली दहा वर्षे जातपंचायतीच्या दडपशाहीतून समाजाबाहेर बहिष्कृत केले होते. या कुटुंबाने जातपंचायतीच्या झुंडशाहीविरुद्ध ‘अंनिस’द्वारे तक्रार करत अन्यायाला वाचा फोडली. या अन्यायाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ११) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात १८ घरे व १२५च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या समाजात आजही न्यायव्यवस्थेला समांतर व्यवस्था जातपंचायत सुरू असल्याचे या घटनेमुळे उजेडात आले आहे. समाजात एकूण १३ पंच आहेत. ते आजही वेगवेगळ्या प्रकरणात न्यायनिवाडा करतात. 

जातपंचायतीच्या विरोधात जाऊन पांडुरंग चौगुले यांनी २००७ मध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्याच्या मुलाच्या विवाहास पाठिंबा दिला. त्यामुळे समाजातून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. कुटुंबाने या प्रकाराविरोधात वेळोवेळी पोलिसांत तक्रार दाखल केली होती; मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. पीडित कुटुंबातील नंदकुमार या सुशिक्षित मुलाने आपल्या कुटुंबावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सरकारच्या जुलै २०१७ च्या जातपंचायत प्रतिबंधक कायद्याचा आधार घेऊन सांगलीतील ‘अंनिस’चे प्रा. आर्डे, राहुल थोरात, संजय बनसोडे, डॉ. संजय निटवे, जयसिंगराव मोहिते यांच्या माध्यमातून लढा उभारला. अखेर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी पथकासह प्रत्यक्ष गावात जाऊन चौकशी केली आणि १३ पंचांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वतंत्र न्यायव्यवस्थेअंतर्गत या जातपंचायतीकडून वादी व प्रतिवादी पक्षाकडून अनामत रक्कम घेतली जाते. तसेच आर्थिक दंडही घेतला जातो. अन्यायाविरुद्ध न्यायालयात गेल्यास समाजातून बहिष्कृत केले जाते. हा आदेश लेखी नसतो हे विशेष. विवाह जमवणे व घटस्फोट याबाबतचे निर्णयही जातपंचायतीमार्फत केले जातात. अवघ्या १२ रुपयांमध्ये घटस्फोट केला जातो. याला कोणताही न्यायिक आधारही नसतो. आंतरजातीय विवाहास १० ते २५ हजारांचा दंड घेतला जातो. पीडित कुटुंबाकडूनही समाजात घेण्यासाठी २५ हजारांची मागणी केली होती. याला विरोध करत ही जातपंचायत मोडून काढून या अनिष्ट प्रथेविरुद्धच या कुटुंबाने दंड थोपटले आहे.

या कुटुंबाला समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी करून न घेणे, कुलदेवता ‘बावटल’ हिचे दर्शन व पूजा न करू देणे, समाजातील शुभकार्यास न बोलवणे, लहान मुलांना खेळू न देणे, समाज मंदिराचा वापर करू न देणे, अंत्यविधीस थांबू न देणे, पै पाहुणे यांना या संबंधित सतत सूचना देणे असे प्रकार या कुटुंबाच्या बाबतीत घडल्याची करुण कहाणीच पत्रकार परिषदेत मांडली. 

यांच्यावर गुन्हा दाखल झाला...
शंकर यल्लाप्पा चौगुले, रावसाहेब शंकर चौगुले, पांडुरंग लक्ष्मण चौगुले, गजानन राजाराम चौगुले, शिवाजी राजाराम चौगुले, दिलीप श्रीपती चौगुले, सोपान लक्ष्मण चौगुले, ज्ञानदेव लक्ष्मण चौगुले, अशोक ज्ञानदेव चौगुले, विलास शिन्नाप्पा चौगुले, आप्पासो शिन्नाप्पा चौगुले, महेश तुकाराम चौगुले, नितीन तुकाराम चौगुले (सर्व रा. तुंग, नंदीवाले वसाहत).

समाजाने झिडकारले; पोलिसांनी ठेवले ताटकळत 
समाजाने वाळीत टाकण्याच्या घटनेसंदर्भात पीडित कुटुंबीय सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी गेले असता त्यांना रात्री साडेअकरापर्यंत ताटकळत बसावे लागले. त्यामुळे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तरी किमान या कुटुंबीयाची वेळेत दखल घेणे गरजेचे असताना त्यांच्याकडून अशी वागणूक मिळाली याच गोष्टीची चर्चा होत आहे.

Web Title: sangli news miraj nandiwale jat panchayat Excluded from Community