Shahajibapu Patil: पुन्हा सांगोल्यात लाल दिव्याची चर्चा! आमदार शहाजी पाटलांना मिळणार मंत्रीपद? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahajibapu Patil

Shahajibapu Patil: पुन्हा सांगोल्यात लाल दिव्याची चर्चा! आमदार शहाजी पाटलांना मिळणार मंत्रीपद?

सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या. तशी सांगोल्यात लाल दिव्याच्या गाडीचीही चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आलेले व जिल्ह्यात शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले आमदार शहाजी पाटील यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल, अशी अशा आता कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.

राज्यातील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सोलापूर जिल्ह्याचे एकमेव आमदार असलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा समावेश होता. या बंडाच्या दौऱ्यामध्येच आमदार शहाजी पाटील यांचे ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओके’ हा डायलॉग मोठा गाजला. शिवसेनेच्या बंडाची एकीकडे चर्चा होत असतानाच आमदार शहाजी पाटील यांच्या या डायलॉगमुळे ते सर्वत्र प्रसिद्धीच्या झोतातच आले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात आमदार शहाजी पाटील यांची उपस्थिती व भाषणं लक्षवेधी ठरत आहेत. राज्यात त्यांना अनेक ठिकाणी सभेसाठी बोलावले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे असलेले आमदार शहाजी पाटील यांनी फायदा घेत सांगोल्यासाठी सर्वच विभागात मोठा निधीही खेचून आणला आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत परंपरागत शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात असलेली सांगोला विधानसभेची जागा अल्पमतात खेचून आणल्यापासून त्यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती.

सध्या सुप्रिम कोर्टाच्या राजकीय निकालानंतर पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. या विस्तारामध्ये प्रसिद्धीच्या झोतात असलेले आमदार शहाजी पाटील यांना मंत्रिपद दिले जाईल व सांगोल्याला लाल दिव्याची गाडी पुन्हा मिळेल, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

लाल दिवा ओके होईल का?

राज्य मंत्रिमंडळात सांगोला आणि मंत्री यांचं नातं तसं अल्प कालावधीसाठीच राहिला गेला आहे. १९७८-८० मध्ये शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये स्व. गणपतराव देशमुख यांना कृषी, विधी व न्याय खात्याचे मंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर त्यांनाच १९९९-२००० मध्ये आघाडी सरकारच्या कालावधीत पणन व रोजगार हमी खात्याचे मंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर सांगोल्याला मंत्रिपदाचा वनवास सहन करावा लागत आहे. सध्या आमदार शहाजी पाटील यांच्या रूपाने पुन्हा मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली असून, सांगोल्याला लाल दिव्याचा वनवास संपेल, अशी आशा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

मंत्रिपद मिळाले तरी संधीचं सोने करीन

मला मंत्रिपदाबाबत कोणतीही लालसा नाही. सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारकडून सांगोला विधानसभेसाठी निधी व महत्त्वाची कामे होत आहेत. मला गेल्या अनेक वर्षांच्या कामाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. कार्यकर्त्यांना मी नामदार व्हावे असे निश्चितपणे वाटत असेल पण मला सांगोल्याला कामांच्या बाबतीत वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचे आहे. याबाबत मी सतत काम करीत आहे व राहणार. मंत्रिपद मिळाले तरी संधीचं सोने करीन.

- शहाजी पाटील, आमदार, सांगोला