पस्तीस वर्षानंतर उदगीरला मिळाले मंत्रिपद

युवराज धोतरे, उदगीर
Monday, 30 December 2019

संघटनात्मक दृष्ट्या भाजपचा गड असणाऱ्या उदगीर विधानसभा मतदार संघात श्री. बनसोडे यानी 2019 च्या निवडणुकीत तब्बल वीस हजाराने पहिल्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला. पहिल्यांदा आमदार होऊन मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला.

उदगीर (जि. लातूर) : उदगीर मतदार संघात 35 वर्षानंतर संजय बनसोडे यांच्या रूपाने मंत्रीपद मिळाले आहे.श्री बनसोडे मुंबईमध्ये शपथ घेताच उदगीरमध्ये कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या दांडगा जनसंपर्कामुळे विजयी झालेले आमदार बनसोडे यांच्या रूपाने उदगीरला राज्यमंत्रीपद मिळाले आहे. यापूर्वी 1984 ते 86 च्या दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या रूपाने उदगीरला राज्यमंत्री पद मिळाले होते.

Image result for sanjay bansode mla

2014 च्या निवडणुकीत आमदार सुधाकर भालेराव यांना दोन, तीन वेळा झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. मात्र यावेळी श्री बनसोडे यांना ही संधी मिळाल्याने उदगीरकरां सोबतच कार्यकर्त्यातही चैतन्याचे वातावरण आहे.

46 वर्षीय संजय बनसोडे यांनी कला शाखेची पदवी घेतली आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण लातुरात घेतल्यानंतर देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात नेतृत्वाची चुणूक दाखविल्याने कायम विद्यार्थीप्रिय नेता अशी त्यांची ओळख राहिली होती. त्याच कालावधीत त्यांनी एनएसयूआयया विद्यार्थी संघटनेचे काम सुरू केले. 1992 साली त्यांनी थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. मराठवाडा नामांतराच्या चळवळीमध्ये शरद पवार यांच्या सोबत त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला होता.

क्लिक करा - मोलमजुरी ते मंत्रिपद

1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसची लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अशी जबाबदारी पक्षाने दिली. त्यानंतर ते अनेक वर्ष प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केले. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या तिरंग्या लढाईत मतदारसंघातून श्री. बनसोडे यांचा निसटता पराभव झाला होता. पराभवानंतर त्यांनी खचून न जाता गेली पाच वर्षे मतदारसंघ पिंजून काढला. मतदारसंघातील सर्व गावात संपर्क असल्याने व लोकांच्या प्रत्येक प्रश्ननाकडे लक्ष असल्याने जनसामान्यांचा सोबती अशी त्यांची ओळख मतदारसंघात निर्माण झाली.

Image result for sanjay bansode mla

संघटनात्मक दृष्ट्या भाजपचा गड असणाऱ्या उदगीर विधानसभा मतदार संघात श्री. बनसोडे यानी 2019 च्या निवडणुकीत तब्बल वीस हजाराने पहिल्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला. पहिल्यांदा आमदार होऊन मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या रूपाने उदगीर करांना तब्बल 35 वर्षानंतर राज्यमंत्रीपद लाभले आहे.

कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष

संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शहरातील शिवाजी चौकात महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूरखा पठाण, पद्माकर उगिले, फैजुखा पठाण, इब्राहिम शेख देवर्जनकार, राजकुमार बिरादार वसंत पाटील, मुन्ना मदारी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष...

उदगीर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ एक जिल्हा परिषद सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य एवढंच संख्याबळ असताना पाच वर्षे परिस्थितीशी संघर्ष करून कार्यकर्ते मतदारांची जुळवाजुळव करून मतदारांमध्ये आपला माणुसकी प्रतिमा तयार करण्यात संजय बनसोडे यशस्वी झाले. त्यांच्या या प्रतिकूल संघर्षाला न्याय मिळाला असल्याची भावना मतदारात आहे.

क्लिक करा आणि लातुरातलं दुसरं मंत्रिपद मिळालेल्या माणसाचा प्रवास जाणून घ्या

उदगीर मतदार संघामध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या पाच सात वर्षांमध्ये अनेक अडचणी होत्या आता आमदार बनसोडे यांना राज्यमंत्रीपद मिळाल्याने आम्हा कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झाला आहे आम्ही उदगीर मतदारसंघामध्ये पक्षवाढीसाठी व मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहोत.
- समीर शेख, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, उदगीर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Bansode Takes Oath As A Cabinet Minister Of Maharashtra Udgeer Latur Breaking News