
Eknath Shinde: शिवसेनेतून पहिली हकालपट्टी संजय राऊतांची, शिंदेंची शिस्तभंग समिती पक्षाला शिस्त लावणार?
एकीकडे राज्याच्या सत्तासंघर्षावर सुरू असतानाच दुसरीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या विरोधात बोलणे, पक्षातील नेत्यांची बदनामी करणे, पक्ष विरोधी पाऊले उचलणे, असा ठपका ठेवत ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव चिन्ह आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये पक्षाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.
त्याचबरोबर या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत त्रिसदस्यीय शिस्तभंग समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून मंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत दादा भुसे यांच्यासह मंत्री शंभुराज देसाई आणि सदस्य संजय मोरे असणार आहेत.
आता या कार्यकारणीकडून लवकरच खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करणार असून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती साम या मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी शिवसेनेत बंड केलं आणि शिवसेनेत दोन गट पडले. त्यामुळे राज्यातील तत्कालीन महाविकासआघाडी सरकारचं बहुमत कमी झाले. याशिवाय शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले. शिंदे ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेल्यानंतर संजय राऊत यांच्याकडून वारंवार त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला जात होता.