
Sanjay Raut : 'अन्यायावर बोलायला अजित पवारांनी कुणाला वकीलपत्र दिलंय का?', संजय राऊत पुन्हा थेट बोलले
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षसंघटनेत मोठे बदल केले आहेत. आज पक्षाच्या वर्धापनदिनी पवारांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. पक्षाच्या कार्याध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली.
शरद पवार यांनी अजित पवारांना डावलल्याच्या चर्चा होत आहेत. मात्र अजित पवारांनी प्रतिक्रिया देतांना नवीन पदाधिकारी यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला.
माध्यांनी संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींवर मी बोलणार नाही. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत शिवाय ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.
काय म्हणाले संजय राऊत?
अजित पवारांवर अन्याय झाला का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारण्यात आला. त्यावर बोलतांना राऊत म्हणाले की, कोणावर न्याय अन्याय झाला असेल तर ती व्यक्ती स्वतः बोलेल. बाहेरच्यांनी का बोलावं? त्यांचं वकीलपत्र त्यांनी कुणाला दिलंय का? भाजपला दिलंय का? की आम्हांला दिलंय? ते समर्थ आहेत. शरद पवार समर्थ आहेत. ते बोलतील, अशी सावध प्रतिक्रिया राऊतांनी दिली.
पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की, अन्य पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर कुणी बोलू नये. आज त्यांचा वर्धापन दिन आहे. त्यांच्या पक्षाला २५ वर्षे झाली आहेत. आज त्यांच्या पक्षात नवीन घडामोडी घडत असतील तर आम्ही का बोलावं. शरद पवार त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी त्या नवीन नियुक्त्या केलेल्या आहेत. त्यामुळे तेच बोलतील, असं राऊत शेवटी म्हणाले.