ShivSena: शिवसेनेवरचा हक्क गेल्यानंतर संजय राऊतांच्या भावाची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena News

ShivSena: शिवसेनेवरचा हक्क गेल्यानंतर संजय राऊतांच्या भावाची प्रतिक्रिया चर्चेत; सुनिल राऊत म्हणाले...

मुंबईः निवडणूक आयोगामध्ये सुरु असलेला शिवसेनेच्या हक्काचा मुद्दा काल संपुष्टात आला. आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिलेलं आहे. यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

देशातली लोकशाही संपल्याचं हे प्रतिक असल्याचं काल उद्धव ठाकरेंनी सांगून बाळासाहेबांच्या देव्हाऱ्यातलं धनुष्यबाण त्यांनी आमच्याकडेच असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला करत त्यांनी गहाण ठेवलेलं धनुष्यबाण मी सोडवून आणलं, असं म्हटलं आहे.

दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असतांनाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी मात्र स्पष्ट आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड चालतो, हेच आम्हाला ठाऊक आहे, असं राऊत म्हणाले.

सुनिल राऊत पुढे म्हणाले की, आमचं चिन्ह 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे आहे. महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड चालतो. आमची निशाणी ठाकरे, आमचे प्रमुख ठाकरे आणि आमचा पक्ष 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हाच आहे. उद्धवजी जे चिन्ह देतील त्यावर आम्ही निवडणूक लढवू असं सुनिल राऊत म्हणाले.

काल उद्धव ठाकरे यांनी काही लोकांनी धनुष्यबाण चोरी केल्याचं म्हटलं होतं. हा हलकटपणा असून नामर्दांनो, तुम्हाला ही चोरी पटणार नाही असंही ते म्हणालेले. शिवाय निवडणूक आयुक्तांविषयी बोलतांना त्यांनी शेण खाल्ल्याची भाषा ठाकरेंनी केली होती.