कुणाची भाषणं जोरदार?

संतोष धायबर
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

आपल्याला काय वाटते?

  • प्रतिक्रियांमध्ये आवर्जून लिहा...
  • मतचाचणीत आपले मत नोंदवा...
  • सविस्तर प्रतिक्रिया webeditor@esakal.com वर ई मेल करा. Subject मध्ये लिहाः leader's speech
  • सकाळ संवाद मोबाईल अॅप डाऊनलोड करा आणि आमच्यापर्यंत आपले मत ऑडिओ-व्हिडिओद्वारे पोहोचवा

राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार सुरू असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाषणातून नेते एकमेकांवर टीका करताना दिसत असले तरी प्रत्येक नेत्याची भाषणाची आगळी-वेगळी शैली आहे. भाषणातून नागरिकांचे कधी मनोरंजन होते तर कधी टीका तर कधी आश्वासकता अनुभवायला मिळते... मतदारराजासमोर भाषणांची पुंगी येत्या काही दिवसांत आणखी जोरजोरात वाजविली जाणार आहे.

राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभा होत असून, नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. प्रत्येक नेत्याचा एक चाहता वर्ग असून, प्रत्येकाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक नेता भाषणादरम्यान राजकीय टीका करतो. शिवाय, मोठ-मोठी आश्वासने देतानाचे भाषणेही ऐकायला मिळतात. विविध नेत्यांच्या भाषणाचे व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर अपलोड होत असून, नेटिझन्स प्रतिक्रिया नोंदविताना दिसतात. कोणत्या मतदाराला कोणत्या नेत्याचे भाषण आवडेल हे सांगता येत नसले तरी एका तरी नेत्याचा तो चाहता नक्कीच असतो. शांत, आक्रमक, गंमतीशीर, गंभीर व मुद्देशीर भाषणे ऐकायला मिळतात. राज्यामध्ये नेहमीच चर्चेत असलेल्या नेत्यांच्या भाषणाविषयी थोडक्यात...

देवेंद्र फडणवीस-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण 'नॉन स्टॉप' असल्याचे जाणवते. भाषणादरम्यान मोठ्या आवाजात ते बोलत असल्यामुळे काही वेळानंतर ऐकायचा कंटाळा येतो.

अजित पवार-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे भाषणादरम्यान मिश्किल वक्तव्यांनी उत्साहाचे वातावरण निर्माण करतात. लोकांच्या हसविण्याच्या नादात काय घडते, याचे परिणाम माहिती असूनही दादांची भाषणाची शैली कायम राहिली आहे.

उद्धव ठाकरे-
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे भाषण गंभीर वाटते. परंतु, मुद्देसुद विषयांची मांडणी असल्यामुळे ते कंटाळवाणे होत नाही. मित्रपक्षासह विरोधकांवर थेट टीका करत असल्याने त्यांचे भाषणाला चांगला प्रतिसाद मिळतो.

राज ठाकरे-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे विरोधकांवर थेट हल्लाच असतो. राज ठाकरे यांच्या भाषणाला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. बहुतांशवेळा मनोरंजनापलिकडं फारसं काही हाती लागत नाही.

अशोक चव्हाण-
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे भाषण संयमित असल्याचे जाणवते. मुद्देसुद व शांतपणे ते विरोधकांवर टीका करताना दिसतात. चव्हाण यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.

रामदास आठवले-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांचे भाषण सुरू झाले की नागरिकांमध्ये हशा पिकायला सुरवात होते. भाषणादरम्यान ते यमक जुळविणाऱया कविता करत असल्याने चर्चेत राहतात. आठवले यांच्या छोट्या-छोट्या कविता सोशल नेटवर्किंगवर शेअर होताना दिसतात. समर्थक वगळता इतरांसाठी आठवले यांचे भाषण म्हणजे टाइमपास.

नारायण राणे-
माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आपल्या भाषणाची एक वेगळी शैली जपली आहे. विरोधकांवर कायमस्वरूपी जोरदार टीका करत असतानाच ते आपल्या देहबोलीतून खूप काही सांगून जातात. राणे यांच्या भाषणाला नेहमीच मोठी गर्दी पहायला मिळते.

धनंजय मुंडे-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भाषणातील भाषा कडक असते. रोखठोक व कडक भाषेमुळे ते चर्चेत राहतात.

विनोद तावडे-
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या भाषणाला नागरिकांचा हवा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. परंतु, भाषणा दरम्यान जे काही बोलतात त्यानंतर ते चर्चेत येतात.

किरीट सोमय्या-
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांची भाषणशैली इतर नेत्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. शब्दांच्या अनुच्चारामुळे अनेकजण त्यांच्या भाषणाकडे गंमत म्हणून पाहतात. परंतु, भाषणादरम्यान ते पुराव्यासह बोलताना दिसतात.

आशिष शेलार-
भारतीय जनता पक्षाचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांचे भाषण खोचक म्हणूनच ओळखले जाते. विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

पंकजा मुंडे-
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व महाराष्ट्रातील आघाडीच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण जोरदार व प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करणारे असते. वडिलांकडून त्यांना राजकीय धडे मिळाल्यामुळे व वडिलांची भाषण शैली त्यांनी घेतल्याचे जाणवते.

सुप्रिया सुळे-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण संयमित व मुद्देसुद असते. भाषणादरम्यान ते विरोधकांवर टीका करताना वडिलांप्रमाणे मिश्किली करताना दिसतात.

नेत्यांच्या भाषणाबद्दल मतदार म्हणून आपल्याला काय वाटते?

  • प्रतिक्रियांमध्ये आवर्जून लिहा...
  • मतचाचणीत आपले मत नोंदवा...
  • सविस्तर प्रतिक्रिया webeditor@esakal.com वर ई मेल करा. Subject मध्ये लिहाः leader's speech
  • सकाळ संवाद मोबाईल अॅप डाऊनलोड करा आणि आमच्यापर्यंत आपले मत ऑडिओ-व्हिडिओद्वारे पोहोचवा
Web Title: santosh dhaybar wirte article on leader's speech