भाजप आमदारांना सत्तेची मस्ती

संतोष धायबर
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

जवान कुटुंबापासून दूर राहून देशाची सेवा करतो. उन, वारा, थंडी, पावसात सीमेचे रक्षण करतो. जवानांचे हाल काय असतात हे तुम्हाला काय कळणार? तुम्ही सुद्धा सेवा करता. परंतु, एसीमध्ये बसून...ऐशोआरामात. असे जर वक्तव्य सामान्य नागरिकाने केले असते तर तुम्हाला ते सहन झाले असते का?

पंजाबमधील सीमेवर लढत असलेला जवान वर्षभर तिकडे असतो. त्याला इकडे मुलगा झाल्याचे तार करून कळविले जाते. मग तो तिकडे पेढे वाटून आनंद साजरा करतो. असे कसे काय होते, हे बेताल वक्तव्य पंढरपूरमधील भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे. आत्महत्या करणारे शेतकरी म्हणजे सवलती लाटणारे व्यापारी, हे असह्य वक्तव्य केलेय मध्यप्रदेशातील भाजपचा आमदार रामेश्वर शर्मा यांनी. या वाचाळवीर आमदारांना खरंच सत्तेची मस्ती चढली आहे का?

पंढरपूर तालुक्यातील भोसेमधील सभेत बोलताना परिचारक यांची जीभ घसरली. ते म्हणाले, सीमेवर लढत असलेला जवान वर्षभर तिकडे असतो. त्याला इकडे मुलगा झाल्याचे तार करून कळविले जाते. मग तो तिकडे पेढे वाटून आनंद साजरा करतो. असे कसे काय होते, यालाच राजकारण म्हणतात. 

अहो परिचारक, सीमेवर लढणाऱया जवानांबद्दल तुम्हाला काय कळणार? जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा करतात ना, त्यामुळे तुम्ही-आम्ही शांत झोपतो. हे तरी तुम्हाला माहित आहे काय? माहित नसेल तर जाणून घ्या. भाषणादरम्यान तुम्हाला काय बोलावे, याचे तरी भान राहिले होते का? राजकारण जरूर करा...परंतु, जवान आणि महिलांच्या चारित्र्यावर शंका निर्माण होईल, असे तरी वक्तव्य करू नका. अहो, तुम्हाला काय बोलावे, याचे तरी भान आहे का? तुम्ही आमदार आहात? हे सुद्धा विसरले का? 

जवान कुटुंबापासून दूर राहून देशाची सेवा करतो. उन, वारा, थंडी, पावसात सीमेचे रक्षण करतो. जवानांचे हाल काय असतात हे तुम्हाला काय कळणार? तुम्ही सुद्धा सेवा करता. परंतु, एसीमध्ये बसून...ऐशोआरामात. असे जर वक्तव्य सामान्य नागरिकाने केले असते तर तुम्हाला ते सहन झाले असते का? वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर तुम्ही कितीही माफी मागितली तरी त्याचा उपयोग तो काय? नैतीक जबाबदारी म्हणून तुम्ही आमदारकीचा राजीनामा देणार आहात का? परिचारक, तुम्ही एक आमदार आहात... देशात काय चालले आहे, हे तुम्हाला समजायला हवे. तार बंद होऊन किती दिवस झाले हे तरी माहित आहे का? आणि जवान व वीर जवानांच्या पत्नींच्या चारित्र्याविषयी शंका घ्यायला निघाले. बस्स.... परिचारक तुम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करू नकाच.

मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा काय म्हणतात पहा. 'आत्महत्या करणारे शेतकरी म्हणजे सवलती लाटणारे व्यापारी.' खरंच, सवलतींसाठी शेतकरी आत्महत्या करतील का? जीव देणे एवढे सोपे आहे का? देशातील शेतकरी शेतात काबाडकष्ट करून जे पिकवतो त्यांच्या जीवावर आपण चार घास खातो. एवढेतरी किमान लक्षात ठेवा. सवलतींसाठी आत्महत्या करायची असती तर शेती कोणी केलीच नसती. सर्वच शेतकऱयांनी आत्महत्या केल्या असत्या. आणि तुम्ही सांगा...शेतकऱयांनी आत्महत्या केल्यानंतर कोणत्या एवढ्या सवलती मिळतात? 

भाजपच्या परिचारक व शर्मा यांच्यासारख्या वाचाळवीर आमदारांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात राग आहेच. परंतु, पक्षाचेही ते नुकसान करत आहेत. खरंच, त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवानांबद्दल आदर बाळगण्यास सांगातात. शिस्तीचे धडेही देतात. आणि दुसरीकडे यांचेच आमदार जवानांबद्दल नको ते बोलतात. देश बदल रहा है... मोदी साहेब आमदाराच्या बेताल वक्तव्य नागरिकांनी सहन करावीत काय? हे आजचेच नाही. यापुर्वीही भाजपच्या नेत्यांनी बेताल वक्तव्ये केली आहेत. बेताल वक्तव्ये कशामुळे करत आहेत, हे एकदा तपासून पहा? जनता हे सहन करणार नाही... राजकारण जरूर करा. परंतु, किमान जवान व किसान यांना तरी सोडा... 
जय जवान, जय किसान.

Web Title: Santosh Dhaybar writes about jawan and farmers