आई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...

बुधवार, 31 जानेवारी 2018

रस्त्यावर अर्भकाला टाकून जाणे म्हणजे त्या अर्भकाचा जीव घेण्यासारखेच नव्हे का? ज्यांचे नशिब बलवत्तर ते वाचतात. अन्य अर्भकांचे काय? गुन्हे दाखल होतात, तपास सुरू राहतो. अर्भक टाकून द्यायचे असेल तर त्यांना जन्म द्यायचाच का?

जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा. शरीरावर उबदार कपडे असतानाही अंथरूणातून, खिडकीबंद घरातून बाहेर पडायला नको वाटते. कारण, आपल्याला थंडी जाणवते म्हणून. दुसरीकडे मात्र थंडी काय असते, याची जाणीवही न झालेल्या अर्भकांना पहाटे कडाक्याच्या थंडीत उघड्यावर, रस्त्याच्या कडेला, झाडा-झुडपात, उकिरड्यावर टाकून दिले जाते. काय अवस्था होत असेल या बाळांची? काय चूक त्यांची...? त्यांच्या आई-बाबांनी समाजाला घाबरल्याची शिक्षा त्यांनी का भोगायची? या अर्भकांना बोलता आलं असतं, तर त्यांनी आर्त आवाजात विचारले असते, आई-बाबा सांगा ना आमची काय चूक...

या महिन्यात अर्भकांना रस्त्याच्या कडेला, झाडाझुडपात, उकिरड्यावर टाकून दिल्याच्या विविध बातम्या राज्यभरातून प्रसिद्ध झाल्या. त्या वाचून अनेकांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. अनेकजण हळहळलेही. पुन्हा त्याच-त्याच बातम्या वाचायला मिळत होत्या. काही अर्भकांचे नशिब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. पण...कडाक्याच्या थंडीत उघड्यावर टाकलेल्या बाळांची अवस्था काय होत असेल? कीडे-मुंग्या चावत असतील. वन्य प्राणी लचके तोडत असतील. रडून...रडून काहींचा जीवही जात असेल. विषय तिथेच संपूनही जातो. पण, कडाक्याच्या थंडीतही उघड्यावर टाकलेल्या काही बाळांचे नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचले आहेत.

घटना क्रमांक एकः
चार तासांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाला रस्त्यावर सोडून आई फरार

Baby
देवळाणे-कर्र्हे (नाशिक) रस्त्यावर इच्छामणी गणपती मंदिराजवळ युवराज श्रावण काकुळते यांची शेती. संबंधित शेतकरी रात्री आपल्या शेतातील पिकांना पाणी देत होते. पहाटे चार वाजेच्या सुमारास विद्युत पंप बंद करून शेतातील घराकडे जात असताना त्यांच्याच शेतात जनावरांसाठी रचून ठेवलेल्या चाऱ्याजवळून बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने ते घाबरले. बागलाण तालुक्यातील देवळाणे-कर्र्हे रस्त्यावरील इच्छामणी गणपती मंदिराजवळ चार तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात पुरूष जातीचे जिवंत अर्भक सापडले. स्थानिकांनी तात्काळ जायखेडा पोलिस ठाण्याच्या मदतीने नवजात बालकाला सटाणा येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने अर्भकास वाचविण्यासाठी यश आले आहे.

घटना क्रमांक दोन:
म्हसोला येथे स्त्रीचे अर्भक सापडल्याने खळबळ

marathi news new born baby girl found
आर्णी तालुक्यातील म्हसोला (यवतमाळ) येथे ता 24 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ असलेल्या उकिरड्यावर स्त्रीजातीचे अर्भक फेकण्यात आले. गावच्या सरपंचानी त्या अर्भकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर होती.

घटना क्रमांक तीन:
काटेरी झुडपात पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत अर्भक आढळले

marathi news new born baby girl found
वाघापूर (ता. साक्री, धुळे) येथील शेतकरी आत्माराम तापीराम कोळेकर यांना शेतातून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला नाल्याजवळ काटेरी झुडपात पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत नायलॉनच्या पिशवीत स्त्री जातीच्या लहान बालकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती गावात सांगितली व तत्काळ निजामपूर पोलिसांना माहिती देऊन बालकास जैताणे आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. गुन्हा दाखल... तपास सुरू... पण, बालिकेला पाहताक्षणीच तीन महिन्याच्या मुलीची 'आई' असलेल्या तेथील महिला पोलिस कर्मचारी सुरेखा भामरे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी संबंधित मुलीस स्तनपान केले व पोटच्या मुलीप्रमाणे काही तास त्या बेवारस मुलीची काळजी घेतली. त्यांनतर संबंधित बालिकेस जिल्हा रुग्णालयात नेले.

आदर्श घटनाः
नदाफ दांपत्य बनले अनाथांचे आई-बाबा!


कोळे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील समीर व सलमा नदाफ हे दांपत्य स्वत-च्या तीन मुलांसह 27 मुलांचे संगोपन करण्याचे दिव्य हे दांपत्य लीलया पेलत आहे. तेही सरकारच्या एक रुपयाच्या मदतीशिवाय. त्याला कारणही तसेच आहे, ते म्हणजे. दोन दिवसांचे अर्भक उघड्यावर फेकले होते आणि दोन कुत्री त्याचे लचके तोडत होती. ती रात्र अस्वस्थ करणारी होती. त्याच दिवशी समीर यांनी ठरवले, की "त्या' अर्भकाप्रमाणे कोणी अनाथ असता कामा नये. हे काम सोपे नव्हते, त्यांनी प्रथम पत्नी सलमा यांना विचारले, "तू साथ देणार असशील, तर अनाथ मुलांना सांभाळायचे'. सलमा यांनीही होकार दिला. 25 एप्रिल 2015 रोजी त्या दोघांनी अलौकिक तपाला सुरवात केली. नंतर सांगली, सातारा, कागल, कर्नाटक, मुंबई येथून भीक मागत फिरणारी तब्बल 24 मुले आणली. ती आता अनाथ आश्रमात राहत आहेत. त्यांचे संगोपन हे दांपत्य करत आहे.

रस्त्यावर अर्भकाला टाकून जाणे म्हणजे त्या अर्भकाचा जीव घेण्यासारखेच नव्हे का? ज्यांचे नशिब बलवत्तर ते वाचतात. अन्य अर्भकांचे काय? गुन्हे दाखल होतात, तपास सुरू राहतो. अर्भक टाकून द्यायचे असेल तर त्यांना जन्म द्यायचाच का? अनेक अनाथ आश्रमे अथवा समाजिक संस्था आहेत, त्या मुलांचा सांभाळ करतात. रस्त्यावर टाकून पळून जाण्याऐवजी या संस्थांकडे का नाही हे 'पालक' धाव घेत? पण... यांना सांगणार कोण...सातारा येथील समीर व सलमा नदाफ या दाम्पत्याने एक दोन नव्हे तर 27 मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. तेही सरकारच्या मदतीशिवाय. नक्कीच त्यांचा आदर्श घ्यायला हवा.

असो, मुल होत नसलेल्या दांपत्यांना याची किंमत कळते. परंतु, मुल होणारी दांपत्ये अशी कृत्ये का करतात? असे करण्यास त्यांना कोणी भाग पाडते का? मग त्या मुलाला सांभाळायचेच नसेल तर जन्म का द्यायचा? अनेक प्रश्न निर्माण होतात. तुम्हाला याबाबत काय वाटते? यावर काय उपाययोजना करायला हव्यात? काय काळजी घ्यावी? आपल्या प्रतिक्रिया जरूर व्यक्त करा. आपल्या प्रतिक्रियेमुळे एका अर्भकाचा जरी जीव वाचला तरी खूप झाले. तर चला मग आपल्या प्रतिक्रिया नोंदवा....

Web Title: santosh dhaybar writes baby girl article