विकासाच्या तालावर तरुणाईला नाचवा - पोपटराव पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

राज्यात आज काही ठिकाणी  दुष्काळ आहे, तर काही भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आहे. यामुळे गावचा कारभारी म्हणून  काम करताना सरपंचांनी पाणलोट विकासासाठी  काम करण्याची गरज आहे. यापुढे गावपातळीवरच पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे.

पुणे -  राज्यात आज काही ठिकाणी  दुष्काळ आहे, तर काही भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आहे. यामुळे गावचा कारभारी म्हणून  काम करताना सरपंचांनी पाणलोट विकासासाठी  काम करण्याची गरज आहे. यापुढे गावपातळीवरच पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचा ताळेबंद करा. गावातील तरुणाईला डीजेच्या नव्हे, तर विकासाच्या तालावर  नाचायला लावा, असे आवाहन राज्य आदर्श गाव  व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार  यांनी मंगळवारी पुणे जिल्ह्यातील आदर्श सरपंचांना  केले. 

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील आदर्श सरपंच आणि ग्रामसेवकांचा मंगळवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पोपटराव पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, नगर ‘सकाळ’चे संपादक बाळ बोठे, मुख्य उपसंपादक नयना निर्गुण आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘सरपंचांनी गावात केलेल्या विकासाच्या कामांमुळे भविष्यात त्यांना मोठी संधी मिळते. सरपंचांनी कामाशी प्रामाणिक राहावे, त्यातून गाव नक्की पुढे जाऊ शकते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फारसे मोठे काम दिसत नाही. परंतु, गावातील सरपंचांनी केलेली कामे दिसून येतात. त्यामुळे सरपंचांविषयी चर्चा होते. पुणे जिल्ह्यातील भागडी (ता. आंबेगाव), औरंगाबाद जिल्ह्यातील किनगाव (ता. फुलंब्री) यासारखी गावे विकासाच्या माध्यमातून पुढे येत आहेत.’’   

‘‘सरपंचांनी त्यांचे काम चोख केल्यास गाव, तालुकाच नव्हे; तर जिल्ह्याच्या विकासासही हातभार लागतो. ‘सकाळ ॲग्रोवन’च्या माध्यमातून दरवर्षी सरपंच महापरिषद घेतली जाते. ‘सकाळ’चे सामाजिक विकासाला पाठबळ असते. त्यासाठी दररोज एक तरी बातमी ही समाजातील सकारात्मक आणि विकासात्मक विषयवार प्रसिद्ध केली जाते. ‘सकाळ’ हा नेहमीच समाजासोबत असतो. तसाच गावांच्या विकासाच्या बाबतीत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या पाठीशी राहील,’’ असे फडणीस यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी ६६ सरपंच आणि ३९ ग्रामसेवकांचा गौरव करण्यात आला.

सरपंच आणि ग्रामसेवक ही गावांच्या विकासाची दोन चाके आहेत. या दोघांनी ठरवल्यास गावचा विकास होऊ शकतो. नेतृत्व करताना गावांचा विकास आराखडा तयार केला पाहिजे. राज्यात गेल्या ७२ वर्षांपासून विकासाची कामे सुरू आहेत. मात्र, अद्यापही विकास संपलेला नाही. यापुढे तो संपणार नाही. पुढील काळातही विकासकामे सुरूच राहतील. ही कामे सरपंचांनी प्रामाणिकपणे केली पाहिजेत. त्यात राजकारण करू नये.
- प्रदीप कंद, माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद

‘विरोधकांकडे ऑडिटर म्हणून पाहा’ 
‘‘सरपंचांनी कितीही चांगले काम केले, तरी विरोधक कधीही कौतुकाचा वर्षाव करणार नाहीत. ते कायम चुका शोधत असतात. त्यातूनच ते अनेक प्रश्‍न विचारतात. विविध विषयांची माहिती मागत असतात. अशा वेळी सरपंचांनी त्यांच्याकडे विरोधक म्हणून पाहू नये. त्याऐवजी ऑडिटर म्हणून पाहावे,’’ असा सल्ला पोपटराव  पवार यांनी सरपंचांना  दिला. विरोधकांनी दाखविलेल्या चुकांमुळेच सरपंच चांगले काम करतो आणि संकटाच्या काळात केलेले काम दीर्घकाळ टिकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanches and Gramsevak were honored in Pune district