मराठा-कुणबीस 'सारथी'चे बळ 

रविवार, 6 मे 2018

- सारथी योजनेबद्दल आपले मत फेसबुक आणि ट्विटरवर कळवा
- #MKMSarthi हॅशटॅग वापरून ट्विट करा
- आपली मते webeditor@esakal.com वर पाठवा

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाने सरकारसमोर आव्हान उभे केल्याचे चित्र असताना, सरकारने या समाजाच्या प्रमुख समस्यांवर कायस्वरूपी शास्त्रोक्‍त व संशोधनात्मक पद्धतीने पर्यायी उपाययोजना आखण्यासाठी एका स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्याचा अहवाल स्वीकारला आहे.

शेतीआधारित मराठा व कुणबी या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे पर्याय शोधण्यासाठी "छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था' (सारथी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 79 पानांचा सविस्तर अहवाल सरकारला सादर केला आहे. यामध्ये "सारथी' या संस्थेची कार्यपद्धती व विविध विकासाचा कार्यक्रम सखोल संशोधनानंतर नमूद केला आहे. 

शेती, शेतकरी, रोजगार, शिक्षण, महिला सक्षमीकरण, तंत्रज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात मराठा व कुणबी समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या "सारथी' या संस्थेचा आराखडा या अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे. या संस्थेच्या माध्यमातून मराठा व इतर लक्षित गटांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणे शक्‍य असून, त्यातून समाजाच्या बहुतांश समस्यांवर मात करणे शक्‍य असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. 

संस्थेचा उद्देश 
- मराठा व कुणबी समाजामधून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, असे कुटुंब/ कुटुंबाचे सदस्य म्हणजे मराठा व कुणबी समाजामधून उन्नत आणि प्रगत गट/ व्यक्ती (क्रिमिलेयर) वगळून सर्व कुटुंबीयांसाठी विविध कार्यक्रमांचा लाभ मिळवून देणे. 
- खासगी क्षेत्रात नोकऱ्या किंवा स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे विविध प्रशिक्षण देणे व दरवर्षी सुमारे दहा हजार बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देणे. 
- मराठा व कुणबी समाजातील बेरोजगार युवक- युवतींना उद्योजक प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे. त्यांना लघु व मध्यम दर्जाचे उद्योग अथवा लघुउद्योग उभारण्यासाठी भागभांडवल उभारणे व बॅंकांकडून आर्थिक मदत मिळवून देणे. 
- शासकीय व निम-शासकीय नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या यूपीएससी (प्रशासकीय सेवा), रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, एनडीए, न्यायव्यवस्था, जेआरई, टोफेल, सैन्य व पोलिस भरती, इत्यादींच्या पूर्व तयारीसाठी कोचिंग क्‍लासेस आयोजित करणे किंवा विविध विद्यार्थ्यांना कोचिंगसाठी नामवंत कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रायोजित करणे. तसेच, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. कायदा, अभियांत्रिकी, वैद्यकीय, सीए, व्यवस्थापन, यूजीसी-नेट/ सेट आदींमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कोचिंग क्‍लासेसचे नियोजन करणे. 
- संभाषण कौशल्य, सामान्य ज्ञान, इंग्रजी इत्यादींमध्ये प्रावीण्य यासाठी विविध प्रकारचे फाउंडेशन कोचिंग क्‍लासेस दहावी पास, बारावी पास व स्नातक विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित करणे. 
- लक्षित प्रवर्गातील उमेदवारांना उच्चशिक्षण (एम.फिल आणि पीएच.डी.) मिळविण्यासाठी विविध फेलोशिप देणे व इतर उपक्रम राबविणे (सुमारे 641 फेलोशिप दर वर्षी). 

असे असतील "दूत'.. 
- किसान मित्र : अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, भूमिहीन शेतकऱ्यांना शेती व शेतीसोबत जोडधंद्यासाठी (कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन, मत्स्यपालन इत्यादी) कृषी व इतर खात्यांच्या मदतीने प्रशिक्षणाचा समन्वय साधणे. कृषी, कृषी संलग्न व्यवसायासंबंधी संशोधन व प्रशिक्षणाच्या कामात समन्वय साधणे, तसेच कृषी व कृषी संलग्न व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारे होतील यासाठी शेतकऱ्यांमध्ये किसान मित्राच्या (प्रत्येक तालुक्‍यात किमान दोन) माध्यमाने जाणीव जागृती निर्माण करणे. 
- संविधान दूत ः समाजातील जास्त मागासलेल्या भागामध्ये सामाजिक अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, जातीय दुर्भावना कमी करण्यासाठी सामाजिक सलोखा, वैज्ञानिक जाणीव व जागृतीचे विविध प्रकारचे उपक्रम राबविणे, तसेच भारताच्या संविधानातील लोकांच्या हक्काबरोबर त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत जाणीव जागृती करणे. (प्रत्येक तालुक्‍यात संविधान दूत व संत गाडगेबाबा दूताच्या माध्यमाने) 
- कौशल्य विकास दूत : प्रत्येक तालुक्‍यात किमान दोन प्रशिक्षित कौशल्य विकास दूत मानधन तत्त्वावर नेमून गावोगावी बेरोजगार उमेदवारांना प्रत्यक्ष भेटून, त्याचे कल/आवड जाणून घेतल्यानंतर त्यांना विविध कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमाने नोकऱ्या मिळविण्यासाठी माहिती देणे, त्यांचे मार्गदर्शन करणे. 
- स्वच्छता व व्यसनमुक्ती दूत : गरीब कुटुंबांमध्ये विविध प्रकारच्या व्यसनांचे प्रमाण मोठे आहे. अस्वच्छता व व्यसन या दोन्ही आजारांवर मात करण्यासाठी गावोगावी शासनाच्यावतीने प्रबोधन करणे. 
- तारादूत : महिला सक्षमीकरणासाठी, त्यांच्या प्रबोधनासाठी व त्यांना स्वतःच्या पायावर उभे होण्यासाठी विविध उपक्रम/ प्रकल्पांबाबत मार्गदर्शन करणे. 

- सारथी योजनेबद्दल आपले मत फेसबुक आणि ट्विटरवर कळवा
- #MKMSarthi हॅशटॅग वापरून ट्विट करा
- आपली मते webeditor@esakal.com वर पाठवा

Web Title: Sarthi organisation help Maratha Kunbi community for development