उदयनराजेंना अखेर मिळणार आधार; विधानसभेसोबतच सातारा पोटनिवडणूक

Udyanraje Bhosale
Udyanraje Bhosale

मुंबई : विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार हे आज (सोमवार) निश्चित होणार आहे. कारण, आज याबाबतची अधिसूचना निघणार असून, अखेर उदयनराजे भोसले यांना विधानसभेचा आधार मिळणार आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन आज दुपारी एक वाजता निघणार आहे. विधानसभेसोबत लोकसभेची पोट निवडणूक होणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध उदयनराजे असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी साताऱ्यात सभा घेऊन उदयनराजेंना लक्ष्य केले होते. त्यानंतर येथे जोरदार लढत होणार हे निश्चित आहे.  

यापूर्वी, विधानसभा निवडणुकांबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होऊन, त्यात विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाचा लाभ होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या साताऱ्यातील उदयनराजे समर्थकांच्या हाती निराशा आली आहे. साताऱ्याची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने विधानसभेचा कार्यक्रम जाहीर करताना स्पष्ट झाले होते. पण, आता आज याचे नोटिफिकेशन काढून विधानसभेसोबतच ही निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे.

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तत्पूर्वी, त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या जागेवरील पोटनिवडणूक विधानसभेच्या निवडणुकीसोबतच घेतली जाईल, अशी चर्चा होती. पण, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची कोणतीही पोटनिवडणूक होणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले. विधानसभेसोबत निवडणूक होणार नसल्यामुळे उदयनराजे भोसले एकटे पडल्याची चर्चा सुरू झाली होती. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपची कास धरल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने सातारा पोटनिवडणुकीत तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.  

पोटनिवडणुकीसाठी १८ कोटी खर्च? 
एका विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी साधारणत: तीन कोटी रुपयांचा खर्च येतो. सातारा लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागांचा समावेश आहे. त्यामुळे सातारा पोटनिवडणुकीसाठी सरासरी १८ कोटी रुपयांचा खर्च येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली होती. चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी सरकारने ९१३ कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com