अंदाजपंचे : असाच असेल सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल !

Satara loksabha Election NCP may win this seat
Satara loksabha Election NCP may win this seat

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर संपूर्ण राज्याला आता निकालाची प्रतिक्षा लागलेली असतानाच सातारा लोकसभा मतदारसंघात काय होणार याचीही उत्सुकता राज्यभरात आहे. अतिशय अटीतटीने लढल्या गेलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकल्यानंतर अवघ्या चारच महिन्यात आपल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि साताऱ्यातून पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार सातारा लोकसभेची पोटनिवडणूककही  विधानसभेसोबत झाली. त्यामुळे विधानसभेत सोबतच सातारा पोटनिवडणूकीकडे ही साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचे समर्थकही पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करीत आहेत. श्रीनिवास पाटील यांच्या समर्थकांच्या मते, विधानसभेच्या सहा मतदारसंघांपैकी कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांना एक ते सव्वा लाख मतांचे मताधिक्य मिळेल. याशिवाय, कोरेगाव आणि वाई मतदारसंघातून ही प्रत्येकी 15 ते 20 हजारांचे मताधिक्य मिळेल. सातारा विधानसभा मतदार संघात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची ताकद वाढली असली तरी, श्रीनिवास पाटील यांचे हे सव्वा ते दीड लाखाचे मताधिक्य उदयनराजे यांना सातारा मतदारसंघातून तुटणार नाही आणि श्रीनिवास पाटील यांचा सहज विजयी होईल.



इकडे उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांच्या मते, असा मुद्दा मांडला जात आहे की, सातारा विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना एक लाखाचे मताधिक्य मिळेल. याशिवाय, वाई आणि कोरेगाव मतदारसंघातही उदयनराजे यांना प्रत्येकी  20 ते 25 हजारांचे मताधिक्य मिळेल. आणि हे मताधिक्य श्रीनिवास पाटील यांच्यापेक्षा नक्कीच अधिक असेल. अशाप्रकारे दोघांकडूनही आपल्या विजयाचे दावे करण्यात येत आहेत.
श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात आपण किती मताधिक्याने विजयी व्हाल, असा सवाल आज सकाळी मतदान केल्यानंतर पत्रकारांनी उदयनराजे यांना केला असता ते म्हणाले की माझ्या आणि श्रीनिवास पाटील यांच्या मताधिक्‍यत जमीन अस्मानाचा फरक असेल. उदयनराजे यांनी असा दावा केला असला तरी या दोघांपैकी कोणीही एक उमेदवार दहा ते पंधरा हजारांच्या मताधिक्क्याने विजय होईल, असे मतदानानंतरचा ग्राउंड रिपोर्ट सांगतो.

जनमत असेही सांगते की उदयनराजे यांच्या स्वतःच्या सातारा जावळी मतदारसंघातही श्रीनिवास पाटील चांगली मते घेतील. कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण मतदार संघातील मताधिक्य उदयनराजे यांना तोडणे मुश्कील ठरेल. उदयनराजे यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर अवघ्या चारच महिन्यात पक्ष सोडणे लोकांना आवडलेले नाही. त्याचा फटका उदयनराजे यांना बसेल.

तात्पर्य काय तर अतिशय अटीतटीने झालेल्या या लढतीत कोण बाजी मारणार हे खात्रीशीरपणे सांगणे या क्षणाला तरी अवघड आहे. त्यासाठी येत्या 24 तारखेची प्रतिक्षा करावी लागणार आहे असली तरी उदयनराजे यांचा पराभव अटळ असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com