पुरस्कारासाठी राजकीय पाठबळ हवे की, आणखी काय? मराठमोळ्या प्रियांकाचे मंत्र्यांना ट्‌विट

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 26 August 2020

आज आपल्याला तेनजिंग नोर्गे या गिर्यारोहण क्षेत्रातील अत्युच्च पुरस्कारासाठी डावलले गेले आहे अशी भावना गिर्याराेहक प्रियांका माेहिते हिची झाली आहे. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यापैकी काही जणांची प्रोफाईल (कामगिरी) खोटी असल्याचे तिचे म्हणणे आहे.

सातारा : तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार पटकाविण्यासाठी राजकारणांचे पाठबळ घेऊ की फार मोठ्या कोणाची नातलग बनू का असा खडा सवाल मराठमोळ्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिने ट्‌विटरच्या माध्यमातून केला आहे. वयाच्या 20 व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट, त्यानंतर ल्होत्सेची, मकालू अशी उंच शिखरे पादाक्रांत प्रियांका मोहिते हिने सर केली आहेत.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गिर्यारोहण क्षेत्रातील तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कारासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत अशी माहिती सातारा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रियांकाला प्राप्त झाल्यानंतर तिने अर्ज केला होता. महाराष्ट्रात तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीत जन्मलेल्या प्रियांकास या पुरस्कारासाठी आपली निवड निश्‍चित होईल अशी खात्री होती. त्यामुळे तिने अल्पावधीतच सर्व कागदपत्रांच्या पुर्तता करुन जिल्ह्यापासून ते मंत्रालयापर्यंतच्या पातळीवर सर्वांच्या सहकार्याने वेळेत केंद्र स्तरावर अर्ज पाठविला.

जागतिक वारसास्थळी फुलांचा नजराणा यंदा होणार कैद? 

या पुरस्कारासाठी तिची निवड झालेली नाही असे समजल्यानंतर तिने कोणा कोणाला पुरस्कार मिळाला आहे याची माहिती घेतली. तिच्यापर्यंत ही माहिती पोचताच तिने विलंबही न लावता तिच्या ट्विटरवरुन एक आक्षेप नोंदविला आहे.ती म्हणते माऊंट एव्हरेस्ट , लोहत्से यांच्यासह माऊंट मकालू सर करणारी मी पहिली भारतीय असून देखील तेनजिंग नोर्गे पुरस्कार मिळविण्यासाठी आणखी मी काय केले पाहिजे. तिने केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू तसेच अवजड उद्योगमंत्री प्रकाश जावडेकर यांना ट्‌विट केले आहे. हा पुरस्कार मिळण्यासाठी मी राजकारण्यांचे पाठबळ घेऊ की फार मोठ्या कोणाची नातलाग बनू असा प्रश्‍न देखील केला आहे. 

आता कडुनिंब पळविणार कोरोनाला? कसे ते वाचा

सर्व सामान्य कुटुंबातील प्रियांका मोहितेस आजपर्यंत गिर्यारोहण क्षेत्रातील अत्युच्च कामगिरी करण्यासाठी तिच्या वडीलांनी वेळप्रसंगी घरातील सर्व दागिने गहाण ठेवून पाठबळ दिले. त्यानंतर तिच्या कामगिरीने प्रभावित होऊन ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कूपर उद्योग समूह, हिरा उद्योग समूह यांच्यासह अनेकांनी मोलाची साथ दिली. आज आपल्याला तेनजिंग नोर्गे या गिर्यारोहण क्षेत्रातील अत्युच्च पुरस्कारासाठी डावलले गेले आहे अशी तिची भावना झाली आहे. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यापैकी काही जणांची प्रोफाईल (कामगिरी) खोटी असल्याचे तिचे म्हणणे आहे.

भाविकांचे श्रध्दास्थान श्री शंकर पार्वती गणपती (महादेव) 

मी किल्ले अजिंक्‍यताऱ्याच्या पायथ्याशी राहते. छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे दैवत आहेत. गडकोट किल्ल्यांमध्ये वावरले असल्याने स्वाभिमान काय असतो हे मला पक्के माहित आहे. मला स्वकर्तृत्वावर ठाम विश्‍वास आहे असे नेहमी बोलणाऱ्या प्रियांकाने तेनझिंग नॉरगे पुरस्कारार्थींवर आक्षेप नोंदवून एकप्रकारे न्याय मिळावा जणू अशी अपेक्षाच व्यक्त केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Mountaineer Priyanka Mohite Questions On Tenzing Norgay National Award