पोलिस यंत्रणा झुकते... झुकानेवाला चाहिए!

गुरुवार, 27 जुलै 2017

सातारा - परफेक्‍शनिस्ट नेता अशी उदयनराजेंची ओळख आहे, असे त्यांचे कार्यकर्ते नेहमी बोलतात. कोणत्या वेळी कोणते डाव खेळायचे, याची त्यांना चांगलीच जाण असल्याचेही आवर्जून सांगितले जाते. कालही संपूर्ण पोलिस यंत्रणा जणू त्यांच्यासाठीच राबतेय असा भास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. प्रत्येक लहान-सहान गोष्टींसाठी सर्वसामान्यांना नाडवणाऱ्या यंत्रणेने उदयनराजेंसाठी घातलेला पिंगा पाहून सर्वसामान्य तर कमालीचा अवाक्‌ झाला. सरकारी यंत्रणा झुकते, फक्त झुकानेवाला चाहिए एवढाच कालच्या सर्व घटनाक्रमाचा अर्थ लोक काढत आहेत.

सातारा - परफेक्‍शनिस्ट नेता अशी उदयनराजेंची ओळख आहे, असे त्यांचे कार्यकर्ते नेहमी बोलतात. कोणत्या वेळी कोणते डाव खेळायचे, याची त्यांना चांगलीच जाण असल्याचेही आवर्जून सांगितले जाते. कालही संपूर्ण पोलिस यंत्रणा जणू त्यांच्यासाठीच राबतेय असा भास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. प्रत्येक लहान-सहान गोष्टींसाठी सर्वसामान्यांना नाडवणाऱ्या यंत्रणेने उदयनराजेंसाठी घातलेला पिंगा पाहून सर्वसामान्य तर कमालीचा अवाक्‌ झाला. सरकारी यंत्रणा झुकते, फक्त झुकानेवाला चाहिए एवढाच कालच्या सर्व घटनाक्रमाचा अर्थ लोक काढत आहेत.

कायदा सर्वांसाठी समान. लोकशाही व्यवस्थेत राहणाऱ्या प्रत्येकाला पहिल्यांदा हे शिकवले जाते. मात्र, व्यवहारात काय चाललेय, असा प्रश्‍न अनेकदा सर्वसामान्यांना पडत असतो. अगदी अदखलपात्र गुन्ह्याच्या तपासामध्येही सर्वसामान्याला किती वेळा किती तास पोलिस ठाण्याच्या व प्रतिबंधात्मक कारवाई करणाऱ्यासमोर थांबावे लागते. पोलिसांकडून कशी वागणूक मिळते, याची प्रचिती सामान्य माणूस अनुभवत आला आहे. उदयनराजेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ‘आहे बाबा कायदा,’ असे सहजच अनेकांच्या तोंडातून निघाले. तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेले म्हणणे पाहिल्यावर, तर पोलिस यंत्रणाही कोणालाही सोडत नाही, असेच वाटत होते. नंतर उच्च न्यायालयातही उदयनराजेंना जामीन मिळाला नाही. पोलिसांचे म्हणणे,  गुन्ह्याची परिस्थिती आणि जिल्हा न्यायालयाचा आदेश या सर्वांकडे पाहता उच्च न्यायालयालाही उदयनराजेंना अटकपूर्व जामीन द्यावा, असे वाटले नाही. बरोबर आठच दिवसांत उदयनराजेंना अटकपूर्व जामीन मिळू नये, त्यांना केव्हाही अटक करू, असे म्हणणे मांडणारी पोलिस यंत्रणा एकदम बदलल्याचे दिसले. अटकेचे सोपस्कार, वैद्यकीय तपासणी, वाहनाची व्यवस्था आणि सर्वांत महत्त्वाचे पोलिसांची न्यायालयातील भूमिका हे सर्वच त्यांच्या तत्परतेची प्रचिती देत होती. उदयनराजेंच्या पोलिस कोठडीची गरज पोलिसांना भासलीच नाही. तपास पूर्ण झाल्याचे यंत्रणेने न्यायालयात सांगितले. कडक अटी व शर्ती नकोत, जामीन देण्यास हरकत नसल्याचेही म्हणणे मांडले. काही असो; पण साताऱ्याची कायदा व सुव्यवस्था पोलिसांनी राखली हे नक्की. 

याचे संपूर्ण श्रेय उदयनराजेंनाच जाते. सर्वांना वाकवता येते. योग्य मार्गाचा अवलंब केला पाहिजे, हे अनेकदा उदयनराजेंनी सामाजिक, राजकीय जीवनात दाखवून दिले आहे. पोलिसांवर असलेला दबाव त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होता. त्यासाठी कोणती चावी फिरवली हे उदयनराजेंनाच माहिती. संभाजी भिडे, भय्यू महाराज यांच्या वक्तव्यांवरून त्याची थोडीफार कल्पना राजकीय वर्तुळाकडून केली जाऊ लागली आहे. मात्र, शिवाजी महाराजांच्या वारशाचा त्यात जास्त वाटा आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करताना औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, त्यांच्याकडून विकसित साताऱ्याची लोकांना अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या उद्योजकतेला लागलेले खंडणी आणि दहशतीचे ग्रहण कोणत्याही परिस्थितीत थांबलेच पाहिजे. उदयनराजेंवर जनतेचे जे प्रेम आहे, त्याला आणि जनतेच्या विश्‍वासाला ते सार्थ ठरवतील, अशीच भूमिका त्यांच्याकडून सातारकरांना अपेक्षित आहे.

Web Title: satara news police Udayanraje Bhosale