उदयनराजेंची सुटका 

उदयनराजेंची सुटका 

सातारा - रोड शोमुळे नाचक्की झालेल्या पोलिस दलाला खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी सकाळीच सुखद धक्का दिला. सकाळी साडेआठलाच उदयनराजे स्वत:हून शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. कार्यकर्त्यांच्या भावनांना कोणतीही ठेच पोचू नये, यासाठी उदयनराजेंची बडदास्त राखतच पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्‍यावर त्यांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला. पुढील सुनावणी बुधवारी (ता. 2) होणार आहे. एक दिवसाआड तपासासाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश त्यांना न्यायालयाने दिले आहेत. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल, अशा पद्धतीच्या घटनाक्रमामुळे शहरात निर्माण झालेला तणाव सायंकाळी ओसरला. 

पोलिस अधिकारी अनुपस्थित 
सकाळी साडेआठची वेळ... सातारकरांची रोजची आवरण्याची धांदल सुरू होती. तशीच शहर पोलिस ठाण्याचीही अवस्था होती. दिवस पाळी सुरू व्हायची असल्याने आणि रात्रपाळीच्यांनी पोलिस ठाणे सोडले असल्याने अवघे एक-दोघेच पोलिस ठाण्यात हजर होते. अचानक एक गाडी शहर पोलिस ठाण्यासमोर थांबली. खासदार उदयनराजे त्यातून उतरले. ते धडक शहर पोलिस निरीक्षकांच्या केबीनमध्ये जाऊन बसले. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना काय करायचे ते सुचत नव्हते. गडबडलेल्या कर्मचाऱ्यांनी निरीक्षकांना फोन केला. त्यांचे अजून आवारायचे होते. खडबडून जागे होऊन त्यांनी आवरायला घेतले. मात्र, तेवढा वेळ उदयनराजेंकडे नव्हता. ते पोलिस ठाण्यातून जलमंदिर या आपल्या निवासस्थानी गेले. तोपर्यंत पोलिस दल खडबडून जागे झाले होते. अधिकाऱ्यांचे फोन खणखणत होते. उदयनराजेंनी पुन्हा गुंगारा दिला, तर काय या शंकेने शहर पोलिसही काहीसे धास्तावले होते. 

अटकेचे सोपस्कार 
साडेनऊच्या सुमारास शहर पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर आल्यानंतर उदयनराजे पुन्हा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. तोपर्यंत कार्यकर्त्यांची संख्याही वाढू लागली होती. उदयनराजेंच्या अटकेच्या बाबतीत कायदा व सुव्यवस्थेची ढाल पोलिस सुरवातीपासूनच करत होते. त्याची पूर्णत: जाणीव आजही पोलिसांना होती, हे पदोपदी त्यांच्या कृतीतून जाणवत होते. कार्यकर्त्यांच्या मनाला, भावनांना जरासाही धक्का बसू नये, याची सर्वोतोपरी खबरदारी पोलिस घेत होते. थोड्यात वेळात अटकेची कागदपत्रे तयार करण्यात आली. 

शिवतेजमध्ये वैद्यकीय तपासणी 
अटकेचे कागदोपत्री सोपस्कार उरकल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी उदयनराजेंना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाऐवजी शिवतेज या पोलिस अधिकाऱ्यांच्या विश्रामगृहावर (शिवतेज रुग्णालय) नेण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शिवतेज येथे येऊन वैद्यकीय तपासणी करावी, असे पत्र पोलिसांकडून जिल्हा रुग्णालयात गेले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ताफा शिवतेजवर आला. शिवतेज विश्रामगृहावरच उदयनराजेंची वैद्यकीय तपासणी केली. याच ठिकाणी तपासाचा भाग म्हणून त्यांच्या आवाजाचे नमुनेही घेण्यात आले. 

लवकर हजर करण्याची विनंती 
उदयनराजेंना अटक केल्यानंतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा झाले होते. त्यांच्या भावनांची कदर पोलिसांना पदोपदी होती. एरवी सकाळी अटक केलेल्या संशयिताला दुपारी दोननंतर रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येते. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने उदयनराजेंना लवकर न्यायालयात हजर करण्याची विनंती त्यांच्या वकिलांमार्फत करण्यात आली. पोलिसांनीही तातडीने त्याची अंमलबजावणी केली. 

उदयनराजेंसाठी अधीक्षकांची गाडी 
उदयनराजेंच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात नेण्यासाठी पोलिस गाड्या बाहेर उभ्या होत्या. मात्र, उदयनराजेंना अंबर दिवा असलेल्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या 301 क्रमांकाच्या गाडीमध्ये बसविण्यात आले. त्या गाडीतून त्यांना न्यायालयात नेण्यात आले. या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ धैर्यशील पाटीलही त्यांच्यासोबत गाडीत होते. 

न्यायालयीन कोठडी 
सकाळी अकराच्या सुमारास उदयनराजेंना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या वतीने न्यायालयीन कोठडी मागण्यात आली. ज्येष्ठ विधिज्ञ धैर्यशील पाटील यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, ""उदयनराजे स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती नव्हती. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. 18 मार्चला घडलेल्या कथित खंडणी प्रकाराची 23 मार्चला नोंद झाली. या दोन दिवसांत काय घडले ते सर्वांना माहीत आहे. फिर्यादी स्वत: चालत प्रतिभा रुग्णालयात दाखल झाला होता. तपासणीनंतर संपूर्ण व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना सोडण्यात आले होते. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचा भाग नसल्याचेच स्पष्ट होत आहे.'' उदयनराजेंना उच्च रक्तदाब असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. तो ग्राह्य मानून मुख्य न्याय दंडाधिकारी डी. एस. खराडे यांनी उदयनराजेंना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अतिरिक्त अधीक्षकांच्या गाडीतूनच त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. 
जिल्हा रुग्णालयामध्ये उदयनराजेंना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी तपासणी करत असताना उदयनराजेंनी छातीमध्ये वेदना होत असल्याचे सांगितले. त्यानुसार उदयनराजेंना दाखल करून घेण्यात आले. 

जामिनासाठी अर्ज 
उदयनराजेंच्या वतीने दुपारी अडीचच्या सुमारास जामिनासाठी अर्ज करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. ए. धोलकिया यांच्यासमोर सुनावणी झाली. ऍड. धैर्यशील पाटील यांनी युक्तिवाद केला. त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 439 नुसार जामिनाची मागणी केली. उदयनराजे हजर झाले आहेत. पोलिसांना तपासात सहकार्य आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळावा. सरकार पक्षाचे म्हणणे येईपर्यंत किमान तात्पुरता तरी जामीन द्यावा, अशी त्यांनी मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे मागविले. सरकार पक्षानेही त्यावर आक्षेप घेतला नाही. उदयनराजेच स्वत:हून हजर झाले. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात सहकार्य केले. त्यांचा जबाब, तसेच आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. गुन्ह्याचे आरोपपत्र यापूर्वीच दाखल झाले आहे. त्यामुळे त्यांना अटी व शर्तींवर जामीन मंजूर करण्यास हरकत नसल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी उदयनराजेंना 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्‍यावर अंतरिम जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी बुधवारी (ता. 2) होणार आहे. एक दिवसाआड तपासासाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश त्यांना न्यायालयाने दिले आहेत. 

छातीत वेदना 
जिल्हा रुग्णालयामध्ये उदयनराजेंना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी तपासणी करत असताना उदयनराजेंनी छातीमध्ये वेदना होत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्याची आवश्‍यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाटले. त्यानुसार उदयनराजेंना दाखल करून घेण्यात आले. सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून त्यांना रुग्णालयातील वरच्या मजल्यावरील खोलीत ठेवण्यात आले. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे रुग्णालयाला छावणीचे रूप आले होते. 

जिल्हा रुग्णालयात जल्लोष 
उदयनराजेंना जामीन मिळाल्याची बातमी बाहेर पडताच. जिल्हा रुग्णालयात कार्यकर्त्यांनी घोषणा सुरू केल्या. जिल्हा रुग्णालयात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उदयनराजेंना पाहण्यासाठी आतुरतेने घोषणाबाजी करत होते. साडेपाचच्या सुमारास उदयनराजे जिल्हा रुग्णालयातून बाहेर आल्यावर घोषणांचा पाऊसच सुरू झाला. जिल्हा रुग्णालयातून चालत उदयनराजे मुख्य रस्त्यावर आले. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्या मागे धावत होती. त्यानंतर उदयनराजे गाडीतून निघून गेले. 

पुन्हा कॉलर उडाली 
जिल्हा रुग्णालयासमोरून गाडीतून गेलेले उदयनराजे पोवई नाक्‍यावर येणार असल्याची बातमी कार्यकर्त्यांना समजली. नगराध्यक्षा, नगरसेवक, तसेच शहर व जिल्ह्यातील समर्थक हजारोच्या संख्येने पोवई नाक्‍यावर त्यांची वाट पाहात थांबले होते. रामराजेंच्या विरोधात व उदयनराजेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. काही वेळाने दमयंतीराजे भोसलेही पोवई नाक्‍यावर आल्या. तब्बल तासच्या प्रतीक्षेनंतर उदयनराजे पोवई नाक्‍यावर आले. त्या वेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आपल्या खास स्टाइलमध्ये त्यांनी कॉलर उडवली आणि कार्यकर्त्यांनी मोठा गलका केला. घोषणांच्या आवाजाची पातळी चांगलीच उंचावली होती. बाह्या मागे सारत नेहमीच्या शैलीत ते निघून गेले. त्यानंतर दिवसभर ताटकळलेल्या कार्यकर्त्यांनीही घरचा रस्ता धरला आणि साताऱ्याचे रस्ते मोकळे झाले. 

उदयनराजेंचे आजही धक्कातंत्र 
खंडणीसाठी लोणंद औद्योगिक वसाहतीमधील कंपनीच्या मालकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा खासदार उदयनराजे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सुमारे तीन महिने उदयनराजे साताऱ्यात नव्हते. मागील आठवड्यात उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला. त्यानंतर उदयनराजेंचे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी उदयनराजेंना कधीही अटक होऊ शकते, असे म्हटले होते. उदयनराजेंच्या स्वभावाला न मानवणारी ही कोंडी त्यांनी शुक्रवारी रात्री गनिमी काव्याने फोडली. शुक्रवारी रात्री त्यांनी बिनधास्तपणे रोड शो करत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. कार्यकर्त्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले. मात्र, पोलिस यंत्रणा काहीच करू शकली नाही. या प्रकारानंतर पोलिसांवर चहूबाजूनी टीका झाली. त्यामुळे उदयनराजेंना हजर करून घेण्यासाठी पोलिसांच्या हालचाली वाढल्या होत्या. एक- एक दिवस जाईल तसा पोलिसांवरील दबाव वाढत होता. त्यामुळे डिप्लोमसीचे निकराचे प्रयत्न सुरू होते. मात्र, सरळ हातात येतील ते उदयनराजे कसले. उदयनराजेंच्या हालचालीची माहितीही पोलिस दलाकडे नव्हतीच. पहाटे दोन ते चार ते साताऱ्यातील एका हॉटेलवरच होते. नंतर पुण्याला जाऊन ते पुन्हा साताऱ्यात आले आणि साडेआठला आजही त्यांनी पोलिस दलाला धक्काच दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com