कोणीही असो, गय करणार नाही - नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले... 
- गोंधळ घालणाऱ्या, तयारी करणारांनावरही कारवाई 
- बाहेरुन गुंड आणल्याचीही माहिती समोर 
- गुंडांना आणणाऱ्यांच्याही मुसक्‍या आवळणार 
- पळालेले संशयित किती दिवस, कुठे-कुठे पळणार? 
- गुन्ह्यातील सहभागी प्रत्येकावर कारवाई होणारच 
- बाळू खंदारे, अजिंक्‍य मोहितेचा तडीपारीचा प्रस्ताव 
- "मोक्का' लागू करण्याचाही एक प्रस्ताव 

सातारा - नागरिकांना कायद्याचे राज्य देणे आमचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे कोणताही गाजावाजा न करता निष्पक्ष पद्धतीने दोषींवर कारवाई होईल. दाखल गुन्ह्यामध्ये आणखी कलमे तसेच आणखी नवे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणीही असो, गय केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत मांडली. पोलिस अधीक्षकांनी अत्यंत परिणामकारक पद्धतीने समयसूचकता दाखवत साताऱ्यात झालेल्या धुमश्‍चक्रीची परिस्थिती हाताळली, असेही त्यांनी नमूद केले. 

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री साताऱ्यात झालेल्या राड्यानंतर श्री. नांगरे-पाटील प्रथमच साताऱ्यात आले होते. या वेळी त्यांनी एकंदर परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांचे कौतुक करत पोलिस दलाची पाठराखण केली. ते म्हणाले, ""टोलनाका, नाकाबंदीची ठिकाणे, विश्रामगृह व सुरूची बंगल्याजवळील गर्दी व एकूण परिस्थितीचे पोलिसांनी योग्य पद्धतीने नियंत्रण केले. पोलिस अधीक्षक स्वत: रस्त्यावर उतरून या सर्वांवर नियंत्रण करत होते. मी स्वत:ही माहिती घेत होतो. दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली आहे. त्यामध्ये आणखी काही कलमांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर टोलनाका, विश्रामगृह व अन्य ठिकाणी बेकायदा जमाव करणे, पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे, त्यांना धक्काबुक्की करणे यासंबंधी आणखी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.'' 

तपास व संशयितांच्या अटकेबाबत बोलताना नांगरे-पाटील म्हणाले, ""सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग, मोबाईल लोकेशन व कॉल्स या सर्वांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे केवळ सीसीटीव्हीत नाही म्हणून कोणी सुटलो, अशी भूमिका घेऊ शकत नाही. युवक जमा करणारे, त्यांना काय करायचे हे लांब बसून सांगणाऱ्यांनाही सोडणार नाही. प्रत्यक्ष गोंधळात सामील असणारे, त्याबरोबरच त्याच्या पूर्व तयारीत असणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. प्रत्येक बाबीचा योग्य अभ्यास करून अत्यंत भक्कमपणे गुन्ह्याचा तपास केला जणार आहे. पळून गेलेले संशयित किती दिवस पळणार आणि कुठे-कुठे पळणार? कोणीही असो, गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या प्रत्येकाला अटक केली जाईल. बाहेरून गुंड आणल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. त्याचा शोधही सुरू आहे. त्यांच्याबरोबरच त्यांना आणणाऱ्यांच्याही मुसक्‍या आवळल्या जातील.'' 

परिक्षेत्रामध्ये सर्वच पद्धतीच्या प्रतिबंधात्मक कारवाईवर जोर देण्याच्या सूचना अधीक्षकांना दिल्या होत्या. त्यानुसार सर्वच विभागात चांगले काम झाले. मात्र, तडीपारी व प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये सातारा जिल्ह्यात अव्वल काम झाले असल्याचे श्री. नांगरे-पाटील यांनी सांगितले. या गुन्ह्यातील संशयित बाळू खंदारे व अजिंक्‍य मोहिते यांच्या तडीपारीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यावर अद्याप निर्णय प्रलंबित आहे. लवकरच त्यावर कारवाई होईल, असे श्री. नांगरे- पाटील यांनी नमूद केले. साताऱ्यातून "मोक्‍का' कारवाईचाही एक प्रस्ताव माझ्याकडे आला आहे. लवकरच त्यावरही निर्णय होईल, असेही ते म्हणाले. 

Web Title: satara news Vishwas Nangare Patil