राज्यात पाऊस समाधानकारक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

पुणे - ‘‘यंदाच्या पावसाळ्यात राज्यात समाधानकारक पाऊस पडेल,’’ अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे (कृषी हवामानशास्त्र) उपमहासंचालक डॉ. एन. चट्टोपाध्याय यांनी शुक्रवारी दिली. गेली काही वर्षे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातही दमदार पाऊस होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘सकाळ’च्या साप्ताहिक मुलाखतीसाठी ते कार्यालयात आले होते. त्या वेळी संपादकीय विभागाशी चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली. 

पुणे - ‘‘यंदाच्या पावसाळ्यात राज्यात समाधानकारक पाऊस पडेल,’’ अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे (कृषी हवामानशास्त्र) उपमहासंचालक डॉ. एन. चट्टोपाध्याय यांनी शुक्रवारी दिली. गेली काही वर्षे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातही दमदार पाऊस होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘सकाळ’च्या साप्ताहिक मुलाखतीसाठी ते कार्यालयात आले होते. त्या वेळी संपादकीय विभागाशी चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली. 

चट्टोपाध्याय म्हणाले, ‘‘देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने नुकताच दिला आहे. महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडेल, असे सध्याचे वातावरण आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यात चांगला पाऊस झाला होता. यंदाही तेथे चांगल्या पावसाची शक्‍यता आहे.’’

महाराष्ट्रातील शेतीसाठी जुलैमध्ये चांगला पाऊस पडणे आवश्‍यक असते. १० जुलैनंतर कापूस, सोयाबीन, भाताची पिके घेण्यास सुरवात होते. या वर्षीही या दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्‍यता त्यांनी वर्तविली.

एल निनोचा प्रभाव 
प्रशांत महासागरातील पाण्याचा उष्ण प्रवाह असलेल्या एल निनोमुळे भारतातील मॉन्सूनवर परिणाम होतो, असे बोलले जाते. पण, ३४ टक्के वेळा एल निनोसक्रिय असताना देशात मॉन्सूनचा चांगला पाऊस झाला आहे. या वर्षी आतापर्यंत जुलै-ऑगस्टनंतर एल निनो सक्रिय होण्याची शक्‍यता आहे. पण, तोपर्यंत देशात पाऊस सुरू होऊन दोन महिने झालेले असतील. 

हवामान खात्यात अद्ययावत तंत्रज्ञान
नैऋत्य मौसमी वाऱ्यांकडे (मॉन्सून) देशातील प्रत्येक घटकाचे लक्ष लागलेले असते. शेती, उद्योगापासून ते सेवा क्षेत्रापर्यंतच्या सर्व घटकांवर मॉन्सूनचा दूरगामी परिणाम होत असतो. त्या पार्श्‍वभूमीवर पावसाच्या अंदाजाची अचूकता वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. चट्टोपाध्याय यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘रडार, उपग्रह, जमिनीवरील उपकरणे, तसेच अद्ययावत संगणक प्रणाली यामुळे माहितीचे विश्‍लेषण करून कमी वेळेत अचूक अंदाज देणे शक्‍य होत आहे.’’

तालुका पातळीवरील पावसाचा अंदाज
हवामान खाते गेल्या काही वर्षांपर्यंत देशातील पावसाचा अंदाज देत होते. हे शास्त्र विकसित होऊन आता जिल्हा पातळीवर अंदाज देण्याची क्षमता निर्माण झाली आहे. या पुढे तालुका पातळीवर अंदाज देण्यासाठी हवामान खाते सज्ज होत आहे. त्यासाठी आवश्‍यक माहिती संकलन आणि त्याच्या विश्‍लेषणाची यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होईल. 

अंदाजाची अचूकता वाढणार
पुढील दहा वर्षांमध्ये अंदाजाची अचूकता आणखी वाढणार आहे. अचूक अंदाज वर्तविण्यासाठी योग्य माहितीची आवश्‍यकता असते. हवामानाच्या वेगवेगळ्या घटकांची ही अचूक माहिती संकलित करण्यासाठी रडार, उपग्रह, जमिनीवरील उपकरणे अद्ययावत होत आहेत. त्यामुळे हवामान खात्याला स्थानिक पातळीवरील अंदाज अचूक वर्तविता येतील, असा विश्‍वासही चट्टोपाध्याय यांनी व्यक्त केली. 

Web Title: Satisfactory rain in the State