संजय दत्त,रिया चक्रवर्तीला जामीन मिळवून देणारे सतीश मानशिंदे राणेंसाठी उतरले मैदानात l Nitesh Rane Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय दत्तला जामीन मिळवून देणारे मानशिंदे राणेंसाठी उतरले मैदानात

संजय दत्तला जामीन मिळवून देणारे मानशिंदे राणेंसाठी उतरले मैदानात

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या नियमित जामीन अर्जावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, उद्या मंगळवार (ता.१) दुपारनंतर यावर निर्णय देण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात (Sindhudurg District Court)नितेश राणेंच्या जामिनावर आज सुनावणी झाली. अभिनेता संजय दत्तला जामीन मिळवून देणारे ज्येष्ठ वकील सतीश मानशिंदे (Satish Maneshinde)हे त्यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.

सतीश मानशिंदे यांनी संजय दत्तला शस्त्रास्त्र प्रकरणात जामीन मिळवू दिला होता. तसेच, त्याला टाडाच्या आरोपातून सोडवले होते. अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या प्रकरणातही तेच वकील होते. अनेक बॉलीवूड तारेतारकांचे खटले मानेशिंदे यांच्याकडेच असतात. आणि आता नितेश राणे यांच्या खटल्यात ते उभे आहेत.

हेही वाचा: नितेश राणेंना अटक की जामीन? न्यायालय उद्या देणार निकाल

आज सकाळी ११ वाजल्या पासून जिल्हा न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यावर न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी याबाबतचा निर्णय मंगळवारी देण्यात येईल असे सांगितले. जामीन का मिळावा? याबाबत न्यायालयात तीन तास सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. "नशीब टाडा रद्द झाला आहे, अन्यथा टाडा सुद्धा लावला असता" अशा प्रकारची नाराजी पोलिसांच्या कारभारावर व्यक्त केली. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीन नाकारण्याची कारणे दिली.

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळताना जामीन जिल्हा व सत्र न्यायालयातून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २८ जानेवारी रोजी राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज दाखल करून घेताना न्यायालयाने सोमवारी यावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार आज सुनावणी झाली.

Web Title: Satish Maneshinde Is Appears For Nitesh Rane Bail Application Konkan Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top