
Satyajit Tambe : 'सत्यजित तांबे आमचेच', काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेससोबतची साथ सोडून तर भाजपासोबत जातात की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेसचे नाव न वापरताही सत्यजित तांबे मोठ्या मताधिक्याने अपक्ष म्हणूनच विजयी झाले. यावेळी त्यांना स्थानिक भाजपचा पाठिंबा होता असं जाहीर करण्यात आलं होतं.
नाशिकच्या निवडणूकीमुळे राज्यसह देशभर चर्चेत आलेले पात्र सत्यजित तांबे आता काँग्रेसचे की भाजपचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावरून आज तांबे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर यासंबधी काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलेल्या वक्तव्यामुळे नेमकं काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हंटलं आहे की, नाशिकमध्ये विजयी झालेले सत्यजित तांबे हे आमचेच आहे. झालं गेलं महाभारत विसरून त्यांना पक्षात घ्यावं, अशी विनंती आपण हायकमांडला करणार असल्याचं वक्तव्य माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
काय म्हणाले आहेत विजय वडेट्टीवार?
शिक्षक-पदवीधरच्या पाच पैकी चार जागा आम्ही जिंकलो आहोत. सत्यजित आमचेच असल्याचे आम्ही गृहीत धरतो. तीन जागा महाविकास आघाडीच्या आणि सत्यजितही आमचेच… जे सत्य आहे ते असत्य होऊ शकत नाही. साईबाबांनी यश दिलंय त्यामुळे त्यांच्या चरणावर डोके ठेवायला आलो आहे. भविष्यात असेच यश मिळत राहो यासाठी आशीर्वाद मागितल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
सत्यजित तांबेंच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह घेऊन लढले नाही. सत्यजित आमचे आहेत आणि आमच्या बरोबर राहातील असा विश्वास आहे. झालं गेलं महाभारत विसरून सत्यजित तांबेंना सोबत घ्यावं अशी माझी इच्छा आहे. मी स्वतः हाय कमांडला तशी विनंती करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.