आता शाळांमध्येही थापल्या जाणार भाकरी!

प्रभाकर कोळसे
रविवार, 7 जुलै 2019

ज्वारी, नाचणी व बाजरी या धान्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना देण्याकरिता विविध पदार्थ व पाककृती जिल्हास्तरावर निश्‍चित करायच्या आहेत.

नंदोरी (जि. वर्धा) : केंद्र सरकारपुरस्कृत शालेय पोषण आहार योजना पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता लागू आहे. विद्यार्थी संख्येनुसार प्रतिविद्यार्थी प्रतिदिन अनुक्रमे 100 ग्रॅम व 150 ग्रॅमप्रमाणे तांदूळ अथवा इतर धान्य मंजूर केले जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता येण्याकरिता तांदळाची मागणी 25 टक्‍क्‍यांनी कमी करून त्याऐवजी ज्वारी, नाचणी व बाजरी या धान्यांचा वापर ऑक्‍टोबरपासून करण्याबाबतचा आदेश धडकला आहे. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी हा आदेश दिला. या आदेशाने यापुढे शाळांमध्ये भाकरीही थापाव्या लागणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

मुख्य सचिव (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथे पाच व सहा जून रोजी राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 'डायट'चे प्राचार्य यांची शिक्षण परिषद झाली. या परिषदेत शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. योजनेची प्रभावी अंमलबाजवणी करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. त्यात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्ह्यांनी तांदळाची मागणी 25 टक्‍क्‍यांनी कमी करावी. त्याऐवजी ज्वारी, बाजरी व नाचणी या धान्यांचा वापर करून विविध पाककृती जिल्हास्तरावर निश्‍चित करण्याचे सुचविण्यात आले. 

ज्वारी, नाचणी व बाजरी या धान्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना देण्याकरिता विविध पदार्थ व पाककृती जिल्हास्तरावर निश्‍चित करायच्या आहेत. या निश्‍चितीनंतर ऑक्‍टोबर 19 ते मार्च 20 पर्यंतची ज्वारी, बाजरी व नाचणीची मागणी शाळांनी इयत्ता तपशील, पटसंख्या, शाळेचे कार्य दिवस यानुसार विहित नमुन्यात नोंदविण्याचे कळविण्यात आले आहे. 

कसे होणार शक्‍य? 
या आदेशाच्या अंमलबजावणीने यापुढे शाळांत भातासोबत ज्वारी, बाजरी, नाचणीची सर्वपरिचित पाककृती भाकरीचा समावेश होणार आहे. मात्र, भाकरीसाठी लागणारा वेळ आणि सध्या स्वयंपाकी महिलेला मिळणारे मासिक दीड हजारांचे अल्प मानधन यात कशी सांगड घालायची, असा प्रश्‍न मुख्याध्यापकांसमोर उभा ठाकणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The school nutrition comprises of Jowar, Bajra