शाळांतील गैरवर्तनाविरुद्ध तक्रारीसाठी संकेतस्थळ

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सरकारकडून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तथापि, अशा घटना अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून अशा प्रकारचे कृत्य करणारी कोणतीही व्यक्ती, शाळा, संस्था आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अशा घटनांची तक्रार विद्यार्थी, पालकांनी, कोणाच्याही दडपणाखाली न येता शासनाच्या संकेतस्थळावर, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग यांच्याकडे करावी, त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्‍यातील हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींवर होत असलेल्या अत्याचाराबाबत प्रश्न सदस्य सुनील केदार यांनी उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे बोलत होते. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या घटना या गंभीर स्वरूपाच्या असून ठाणे जिल्ह्यातील ज्ञानमाता या आदिवासी शाळेतील फादर मुलींशी गैरवर्तन करीत असल्याबद्दलची तक्रार आली होती. या प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आलेली आहे. संबंधित फादर विरुद्ध कारवाई करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात येतील.

तावडे म्हणाले की, शाळेतील गैरवर्तन प्रकाराबाबत एखाद्या विद्यार्थिनीने अथवा तिच्या पालकांनी शासनाच्या संकेतस्थळावर तक्रार केल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवून त्याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, हेल्पलाइन क्र. 103 वरसुद्धा पालकांना तक्रार करता येते. त्यामुळे पालकांनी न घाबरता तक्रार करावी. या चर्चेत सदस्य जयप्रकाश मुंदडा, भारती लव्हेकर, देवयानी फरांदे, आशिष शेलार आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Schools abuse complaints to website