साठ वर्षांवरील मालक, नोकर दुकानात असल्यास दुकान सात दिवसांसाठी सील 

प्रमोद बोडके
Monday, 6 July 2020

दंडाच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण 
दंडात्मक कारवाई करण्यासाठी काढलेल्या या आदेशात अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस नाईक, पोलिस हवालदार, गट विकास अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक, ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक यांना दंड करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दंडात्मक केलेल्या कारवाईतून वसूल झालेला दंड चलनाद्वारे शासनाला जमा करावा अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या आदेशात केली आहे. 

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कठोर पावले उचलली आहेत. चेहऱ्यावर कायम रुमाल/मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखूचे सेवन न करणे यासोबतच वाहतुकीची शिस्त व मास्क वापरा संदर्भात त्यांनी नवीन आदेश पारित केला आहे. दुचाकीवर फक्त एका व्यक्तीला प्रवास करण्यास परवानगी दिली असून तीन व चार चाकी वाहनात एक चालक व दोन व्यक्तींना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. दुकानात साठ वर्षावरील मालक अथवा नोकर आढळल्यास ते दुकान सात दिवसांसाठी सील करण्याचाही आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे. 

दुचाकीवर दोघांनी प्रवास केल्यास वाहनचालकास पाचशे रुपयांचा तर तिघांनी प्रवास केल्यास साडेसातशे रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तीन व चार चाकी वाहनात तीन पेक्षा अधिक व्यक्तींनी प्रवास केल्यास पाचशे रुपयांचा दंड वाहनचालकास होणार आहे. मास्क न वापरल्यास शंभर रुपये, जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास त्यांना एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. त्या दुकानाला दोन वेळा दंड झाल्यास तिसऱ्या वेळी दुकानाचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास पाचशे रुपये आणि दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सचे योग्यरीतीने पालन न केल्यास एक हजार रुपयांचा दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दोनशे रुपयांचा दंड, सोशल डिस्टंसिंग पालन न केल्यास प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड, सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखूचे सेवन केल्यास पाचशे रुपयांचा दंड केला जाणार आहे. दुकानदार/व्यावसायिक/फिरत्या फळे व भाजी विक्रेत्यांनी मास्क न वापरल्यास त्यांना शंभर रुपयांचा दंड करण्याची सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seal the shop for seven days if the owner, servant over sixty years