‘महाविकास आघाडी’चा जागा वाटप फॉर्म्युला! महापालिका, झेडपीतील ताकदीवर ठरणार मतदारसंघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahavikas aaghadi
‘महाविकास आघाडी’चा जागा वाटप फॉर्म्युला! महापालिका, झेडपीतील ताकदीवर ठरणार मतदारसंघ

‘महाविकास आघाडी’चा जागा वाटप फॉर्म्युला! महापालिका, झेडपीतील ताकदीवर ठरणार मतदारसंघ

सोलापूर : ‘वज्रमूठ’च्या माध्यमातून महाविकास आघाडीने भाजप-शिंदे सेनेला टक्कर देण्याची रणनीती आखली आहे. जागा वाटपासंदर्भात नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. पण, पुढच्या वर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुका असल्याने पहिल्यांदा महाविकास आघाडीला सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवावे लागणार आहे. त्या निकालाचा अंदाज घेऊन लोकसभा व विधानसभा मतदारसंघ कोणते कोणाकडे ठेवायचे हे निश्चित होईल. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा एक तर राष्ट्रवादीचे दोन आणि सहयोगी एक असे तीन आमदार आहेत. कर्नाटक निवडणुकीतील नेत्यांचा करिष्मा सोलापूर जिल्ह्यात दिसणार का, याची उत्सुकता आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ५४ जागांवर विजय मिळाला होता. पण, महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेतील तब्बल ४० आमदार विरोधी गटात गेल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे सध्या केवळ १६ आमदार राहिले आहेत.

वंचित बहुजन आघाडी, ‘एमआयएम’ असे मित्र पक्ष महाविकास आघाडीसोबत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीपेक्षा वेगळाच आगामी निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला असणार हे निश्चित आहे. सत्तेच्या संघर्षात सद्य:स्थितीत कोणत्या पक्षाची ताकद किती हे आजमावणे कठीणच मानले जात आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजू शकतो. त्या निवडणुकीतील निकालावरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची ताकद कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक आहे, हे स्पष्ट होईल. त्यानुसार पूर्वीपासूनच्या काही विधानसभेच्या जागांमध्ये बदल होऊ शकतो, अशी चर्चा आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी शिवसेनेने जवळपास ९० ते १०० जागांची मागणी केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमोर पेच निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे.

महाविकास आघाडीला बंडखोरीची चिंता

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे. पण, विधानसभा निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यास राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी होऊ शकते. त्याचा लाभ निश्चितपणे विरोधी भाजप व शिंदे सेनेला होण्याचीही दाट शक्यता वर्तविली जात आहे. पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीत त्याची झलक पाहायला मिळाली आहे. त्यामुळे बंडखोरी वाढू नये म्हणून सर्व पक्ष स्वतंत्र लढून सत्ता स्थापनेवेळी एकत्रित येतील, असाही अंदाज बांधला जात आहे.

पवारांनी लक्ष घालताच सक्रिय झाले शिंदे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाकरी फिरविण्याची वेळ आली असल्याची मागणी पंढरपुरातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली गेली. अगोदरच काँग्रेसकडील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला आहे. आता सोलापूर लोकसभा मतदारसंघही गेल्यास काँग्रेसचे भविष्य अंधारमय होऊ शकते. मनात आणले तर पवारसाहेब काहीही करू शकतात म्हणूनच निवडणूक लढणार नाही म्हणत सक्रिय राजकारणापासून दुरावलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याचे पहायला मिळत आहे. रविवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापुरात मोठा कार्यक्रम होणार असून त्यावेळी अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.