मुंबईसह राज्याच्या सुरक्षेसाठी अधिवेशन स्थगित

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

पुलवामावर झालेला भ्याड हल्ला आणि त्यानंतर झालेल्या घडामोडी लक्षात घेता सुरक्षा यंत्रणेवर अधिकचा ताण नको म्हणून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे. विरोधकांच्या या भुमिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक करण्यात आले असून अधिवेशन स्थगित करण्यामागे सुरक्षा यंत्रणेवर ताण कमी व्हावा हा हेतू आहे. 

मुंबई- पुलवामावर झालेला भ्याड हल्ला आणि त्यानंतर झालेल्या घडामोडी लक्षात घेता सुरक्षा यंत्रणेवर अधिकचा ताण नको म्हणून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे. विरोधकांच्या या भुमिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक करण्यात आले असून अधिवेशन स्थगित करण्यामागे सुरक्षा यंत्रणेवर ताण कमी व्हावा हा हेतू आहे. 

अधिवेशन चालू राहिले तर पोलिसांवर अधिकचा ताण येईल म्हणून अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपणार आहे. अधिवेशन रद्द केले म्हणून कोणीही घाबरून जाऊ नये असेही सांगण्यात आले आहे. घाबरून जाण्यासारखी कुठलीही परिस्थीती नसून, पोलिसांवरील ताण कमी व्हावा म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बुधवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यातच सुरक्षा आढावा बैठकीत अधिवेशन संपवण्याबाबत चर्चा झाली होती. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यभरातील आमदार विधानभवन परिसरात असतात. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर याचा ताण येतो. सर्वच महत्वाचे व्यक्ती येथे असल्याने हा परिसर जास्त संवेदशनशील असतो.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचा हा पळपुटेपणा असल्याचा आरोप केला. एकीकडे मोदी देशभरात फिरतात, सभा घेतात. त्यांना संरक्षण लागत नाही का, असा सवाल करत हे नाटक बंद करा. आपला विंग कमांडर पाकिस्तानात आहे आणि आपण पळपुटेपणा करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Security Reason The Legislature Session On Maharashtra Assembly Closed