बियाणांबाबत दुष्काळात तेरावा...

Seed
Seed

नाशिक - कृषीनिविष्ठांची १४ हजार कोटींची बाजारपेठ असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बियाण्यांच्या गेल्या पाच वर्षांत दुप्पटीने भाववाढ झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी झाली आहे. मॉन्सूनच्या खोळंब्याने ज्वारीच्या सात लाख १९ हजार, मुगाच्या तीन लाख ९७ हजार आणि उडदाच्या तीन लाख १८ हजार हेक्‍टरवरील पेरण्यांचे प्रश्‍नचिन्ह आहे. अशा स्थितीत शेतीचे उत्पन्न दुप्पट कसे होणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागलेत.

राज्यात २०१४ मध्ये एक कोटी ५० लाखांहून अधिक क्षेत्र खरिपाचे होते. आता हेच क्षेत्र एक कोटी ५२ लाख हेक्‍टरपर्यंत पोचले आहे. शेतकऱ्यांना २०१४ मध्ये १५ लाख ४१ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले होते; आता हेच प्रमाण १९ लाख ९३ हजारांच्यापुढे गेले आहे. बियाण्यांच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारचे भावावर नियंत्रण आहे की नाही, सरकार त्याकडे कधी लक्ष देणार, असा संताप शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.     

दुष्काळात मक्‍याला चांगला भाव मिळाला. यंदा पाऊस उशिरा सुरू होत असल्याने कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र मक्‍याखाली येईल. मक्‍यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने औषधाचे ‘डबल कोटींग’चे बियाणे विक्रीसाठी आणले. अशी कारणे मक्‍याच्या वाढलेल्या भावामागे दिला जात असली, तरीही ‘डबल कोटींग’मुळे लष्करी अळीचे नियंत्रण कितपत होईल याबद्दल अभ्यासकांना शंका आहे. 

गेल्या पाच वर्षांमध्ये खतांचा भाव वधारला आहे. त्यास युरिआच्या कमी झालेल्या किमतीचा अपवाद आहे. निमकोटेड युरिआच्या ५० किलोच्या गोणीमागे तीन रुपये कमी होऊन आता हा भाव २९० रुपये झाला. मात्र डीएपीच्या गोणीमागे वाढ होऊन १,१८५ ते १,२७० रुपये झाला. शेतकऱ्यांना चांगले भाव मिळावेत म्हणून सरकार किमान आधारभूत किंमत जाहीर करत असले, तरीही हा भाव शेतकऱ्यांना मिळतो का? याचे उत्तर नाही असे मिळते.

कृषी विभागातर्फे बियाणे घरी कसे करायचे याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. बियाण्यांच्या भाववाढीमुळे पेरणी करावी की नाही? असा प्रश्‍न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट ही घोषणा जुमला झाला आहे.
- संजय काळे, शेतकरी, रेडगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com