सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा बंधाऱ्यामध्ये पाणी 

सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा बंधाऱ्यामध्ये पाणी 

मुंबई - पिकांना उन्हाळी हंगामात सिंचन उपलब्ध व्हावे, यासाठी सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा बंधाऱ्यामध्ये 3.50 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय उस्मानाबादचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. या पाण्याचा लाभ फक्त परवानाधारक शेतकरीच घेतील या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी; तसेच नदीपात्रात बेकायदा वीजपंप लावून पाणीउपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश रावते यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

बैठकीस बीड लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, भूमच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, उस्मानाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु. म. जगताप, परंड्याचे उपविभागीय अभियंता प्रकाश देवकते, दीपक सरतापे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीना कोळेगाव प्रकल्पात 11 मे 2017 रोजी एकूण 77.12 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा 2.82 दलघमी तर मृत पाणीसाठा हा 74.30 दलघमी इतका आहे, अशी माहिती या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सीना कोळेगाव धरणातून भोत्रा बंधाऱ्यामध्ये उर्वरित उन्हाळी हंगामासाठी 3.50 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. 

रावते या वेळी म्हणाले की, हे पाणी सोडल्यानंतर पाणीचोरी होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. बेकायदा वीजपंप लावून पाणी खेचणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. याशिवाय या भागातील ज्या परवानाधारक शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरलेली नाही त्यांच्याकडून थकबाकीची तातडीने वसुली करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

बोअरवेलचे पुनर्भरण व्हावे 
धरणातून पाणी सोडल्यानंतर परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. या विहिरींचा वापर परिसरातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी करावा. परिसरात टॅंकर सुरू असल्यास ते भरण्यासाठी या विहिरींचा वापर करण्यात यावा. यासाठी जिल्हाधिकारी किंवा संबंधित प्रांत अधिकारी यांनी आदेश काढून कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले; तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी आपापल्या बोअरवेलचे श्रमदानातून पुनर्भरण करावे. भूजल विकास विभागाकडून तसा दाखला घेण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com