राज्यात ज्येष्ठ नागरिक असुरक्षित 

अनिश पाटील
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

गुह्यांमध्ये मुंबई अग्रेसर; इतरांवर अवलंबून असल्याचा गैरफायदा 

मुंबई : घरातील ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवण्याची संस्कृती असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे ज्येष्ठ नागरिकांविरोधात घडत असल्याचे समोर आले आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांविरोधात सर्वाधिक म्हणजे पाच हजार 321 गुन्हे महाराष्ट्रात घडले आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) 2017 च्या गुन्हे आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. 2016 च्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. राज्याची राजधानीही त्याला अपवाद नसून देशातील प्रमुख महानगरांमध्ये मुंबईत ज्येष्ठांविरोधातील सर्वाधिक म्हणजे एक हजार 115 गुन्हे दाखल झाले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांबाबत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. 2015 मध्ये राज्यात चार हजार 561, 2016 मध्ये 694; तर 2017 मध्ये पाच हजार 321 गुन्हे दाखल झाले आहेत. 2017 मध्ये राज्यात 152 ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या महाराष्ट्रात घडल्या. हत्यांबाबत तमिळनाडूपाठोपाठ राज्याचा क्रमांक लागतो. याशिवाय 66 गुन्हे हत्येचा प्रयत्न, 246 गंभीर मारहाणीचे, 355 जबरी चोरीचे व 1015 फसवणुकीचे गुन्हे वरिष्ठ नागरिकांबाबत घडले आहेत. सर्वांत लाजिरवाणी गोष्ट म्हणजे राज्यात 2017 मध्ये नऊ ज्येष्ठ नागरिक महिलांवर बलात्कार झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 19 ज्येष्ठ नागरिक महिलांवर बलात्कार घडले आहेत.

मुंबईही वरिष्ठ नागरिकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये देशात आघाडीवर आहे. मुंबईत 2017 मध्ये एक हजार 115 गुन्हे घडले आहेत. 2016 मध्ये 1218 गुन्हे घडले होते; तर 2014 मध्ये 944 व 2015 मध्ये 1121 गुन्हे ज्येष्ठ नागरिकांविरोधात घडले होते. उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना दररोजच्या कामासाठी नोकर व इतर व्यक्तींवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांना टार्गेट करणे आरोपींना सोपे जाते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 
मुंबई पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी 1090 क्रमांकाच्या हेल्पलाईवर नोंदणी होते. या हेल्पलाईनवर दर महिन्याला किमान 50 नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे तक्रारीचे दूरध्वनी येतात; त्यात अगदी मुले त्रास देत असल्यापासून घरात पाणी गळत असल्याच्या तक्रारीही ज्येष्ठ नागरिक करत आहेत. मुंबई पोलिसही त्यांच्या परीने या वृद्धांना मदत करतात. 

1090 क्रमांकावर दर महिन्याला 25 ते 30, 103 या हेल्पलाईनवर दर महिन्याला 15-20 नोंदणी केलेले वयोवृद्ध दूरध्वनी करून तक्रारी करतात. त्यानुसार स्थानिक पोलिसांना सांगून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा पोलिस प्रयत्न करतात, तसेच गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले जातात. याशिवाय एसएमएस व सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनही तक्रारी करण्याचा पर्याय मुंबई पोलिसांनी उपलब्ध केलेला आहे. 

मुले पोटभर जेवण देत नाहीत! 
मुले जेवण देत नाहीत, लाऊड स्पीकरच्या आवाजाचा त्रास होतोय, शेजारी त्रास देत आहेत अशा तक्रारी या हेल्पलाईवर येतात. गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये पोलिस गुन्हे दाखल करतात; तर इतर प्रकरणांमध्येही वृद्ध नागरिकांना पोलिस मदत करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय वैद्यकीय सेवेची आवश्‍यकता असेल तेव्हाही पोलिस ज्येष्ठ नागरिकांना मदत करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior citizens in the state are insecure