ज्येष्ठांना प्रतिक्षा, एसटी भाडे सवलतीची !

शिवाजी यादव
रविवार, 15 जुलै 2018

एसटीतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारतर्फे तिकीट भाड्यात सवलत देण्यात येते. सध्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 वर्षे असे मानले जाते. त्यामुळे ज्यांचे वय 65 पेक्षा अधिक आहे, अशांना एसटीच्या साधी गाडी, निमआराम, परिवर्तन, शिवशाही अशा गाड्यांतून तिकिटांत सवलत मिळते. 

कोल्हापूर : सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 वरून 60 वर्षे केले आहे. त्यामुळे एसटीच्या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलतीचा लाभ मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने तसे लेखी आदेश एसटी महामंडळाला दिल्यानंतरच ही सुविधा लागू होणार आहे. यातून राज्यभरातील एक ते दीड कोटी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. 

एसटीतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारतर्फे तिकीट भाड्यात सवलत देण्यात येते. सध्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 वर्षे असे मानले जाते. त्यामुळे ज्यांचे वय 65 पेक्षा अधिक आहे, अशांना एसटीच्या साधी गाडी, निमआराम, परिवर्तन, शिवशाही अशा गाड्यांतून तिकिटांत सवलत मिळते. 

सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षे करून तीन दिवस झाले; पण अजूनही ज्यांचे वय 65 पेक्षा अधिक आहे, अशाच ज्येष्ठांना एसटी भाड्यात सवलत मिळते; तर ज्यांचे वय 60 ते 65 वर्षांदरम्यान आहे, अशांना अजूनही सवलत लागू झालेली नाही. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने एसटी महामंडळाला स्वतंत्र पत्र देऊन ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे अशांनाही सवलतींचा लाभ देण्यासंदर्भात सुचित करावे लागणार आहे, तसे अधिकृतपत्र एसटीला मिळाल्यानंतरच योजनेचा लाभ लागू होणार आहे. 

ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या भाडेसवलतीची जवळपास 574 कोटी 85 लाखांची रक्कम राज्य सरकारने एसटीला देणे बाकी आहे. तरीही एसटीकडून विनातक्रार सवलत योजना देण्यात येत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाला आधार होत आहे. 

सवलतींचे देणे बाकी 

राज्य सरकार व एसटी महामंडळातर्फे समाजातील 24 घटकांना प्रवासी सवलत देते. यात 30 ते 100 टक्के प्रवासी भाड्यात सवलत आहे. या तिकीट भाड्यातील एकूण सवलतींची गतवर्षीची रक्कम 1,383 कोटी आहे. ती राज्य सरकारकडून एसटीला देणे बाकी आहे. 

एसटीच्या ज्येष्ठांसाठी तिकीट सवलती अशा ः 

- साधी गाडी, रातराणी (परिवर्तन) गाडी, निमआरामगाडीसाठी प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत, 
- शिवशाही गाडीत 45 टक्के सवलत 
- शयनयान श्रेणीच्या शिवशाही गाडीत 30 टक्के सवलत 

Web Title: Senior Citizens Waiting for ST Concession