ज्येष्ठ नागरिक होणार स्मार्ट! 

ज्येष्ठ नागरिक होणार स्मार्ट! 

मुंबई - एसटी महामंडळातील 15 सवलती योजनांसाठी "स्मार्ट कार्ड' योजना राज्य सरकारने लागू केली आहे. याचा 65 लाख प्रवाशांना लाभ घेता येणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनेत 50 लाख प्रवाशांची नोंद केली जाणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या 31 विभागांतील प्रमुख आगारांमधून आज (ता. 5) एकाच वेळी नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गैरप्रकारांना चाप बसेल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

राज्य परिवहन विभागातील 15 योजनांसाठी लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या योजनांमध्ये सवलत देण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाला 1,383 कोटी रुपये दिले आहेत. यात पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, 10 दिवसांमध्ये लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड मिळणार आहे. यात वैयक्तिक कार्ड आणि सामायिक कार्ड असतील. वैयक्तिक कार्ड हे केवळ योजनाधारकांना वापरता येणार असून, सामायिक स्मार्ट कार्ड कुटुंबातील सदस्यांनाही वापरता येणार आहे. वैयक्तिक कार्डसाठी लाभार्थ्याला कार्डचे 50 रुपये आणि नोंदणी शुल्क पाच रुपये भरावे लागणार आहे. सामायिक कार्डधारकांना सुरुवातीला 300 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. त्यानंतर 100 ते पाच हजारांपर्यंत रिचार्ज उपलब्ध आहेत. या स्मार्ट कार्डचा डेबिट कार्डप्रमाणे वापर करता येणार आहे. 

एसटी महामंडळाने यापूर्वी सातारा जिल्ह्यातील वाई आगारात 24 फेब्रुवारीला ही योजना सुरू केली होती. त्यानंतर आज (ता. 5) राज्यातील 31 विभागांतील प्रमुख आगारांमध्ये नोंदणी सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com