अजित पवारांची आमदारांची जुळवाजुळव सुरू

संभाजी पाटील
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाणे हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून, पक्षाच्या आमदारांना एकत्रित करण्यास दोन्ही बाजूंनी सुरुवात झाली आहे.

पुणे : महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाणे हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून, पक्षाच्या आमदारांना एकत्रित करण्यास दोन्ही बाजूंनी सुरुवात झाली आहे.

अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार

पक्षाध्यक्ष शरद पवार आमदारांना काय सूचना देतात याकडेही आता आमदारांचे लक्ष लागले आहे. भाजपसोबत सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांनी वीस ते पंचवीस आमदार सोबत घेऊन भाजपला पाठिंबा दिला असल्याचे समजते, मात्र हे आमदार नेमके कोण याची स्पष्टता झाली नाही. पुण्यातील दोन्ही आमदार सध्या पुण्यातच आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना आता अजित पवार हे वैयक्तिक रित्या फोनवरून संपर्क साधत असून त्यांनी आमदारांची जुळणी सुरू केली आहे. हे आमदार दुपारपर्यंत एका ठिकाणी जमणार असून, पुढे मुंबई ला रवाना होतील असेही एका आमदाराने सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये प्रथमच आमदार झालेल्यांची संख्या मोठी असल्याचे समजते. पुणे जिल्ह्यातील आमदारांना अजित पवार यांनी व्यक्तिगत संपर्क साधला असून यातील काही आमदारांनी आपण अजितदादांना सोबतच आहोत असे स्पष्ट केले आहे. मात्र अद्याप आपले नाव जाहीर करायला नको असेही सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापण्याचा अजित पवार यांचा निर्णय हा काही मोजक्या आमदारांना माहिती होता त्याची फारशी चर्चा कुठेही करण्यात आली नव्हती. मात्र सरकार स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या आमदारांची जुळवाजुळव आणि त्यांची संमती अजितदादा यांनी यापूर्वीच घेतली होती. त्यानुसार हे सर्व आमदार आता एकत्र करण्याचे काम सुरू झाले आहे.
पक्षाच्या वतीने ही आपले आमदार अजितदादांसोबत जाऊ नयेत, यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, आमदार फुटणार नाहीत यासाठी काय उपाययोजना करता येतील याची बैठक वरिष्ठ पातळीवर ती सुरू असल्याचे एका आमदाराने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Setting For MLA by Ajit Pawar