सात न्यायाधीशांच्या चौकशी समितीसाठी याचिका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयातील न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सात न्यायाधीशांच्या समितीने करावी, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. संजय भालेराव या सामाजिक कार्यकर्त्याने वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका केली आहे.

सर्वोच्च न्यायालयातही याच मुद्द्यावर याचिका दाखल असली, तरी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पहिल्यांदाच सात न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे, असे सातपुते यांनी सांगितले. न्या. लोया यांच्यापुढे सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या खटल्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह काही वरिष्ठ पोलिस अधिकारी आरोपी होते.

नागपूर येथे 30 डिसेंबर 2014 रोजी न्या. लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या महिनाभरात नव्या न्यायाधीशांनी सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी अमित शहा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दोषमुक्त केले. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या या याचिकेत संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तपासाचा आदेश देण्याची मागणी
सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत 24 जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेत सरकारचे विविध विभाग, अधिकारी, पोलिस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ही याचिकाच प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफआयआर) असल्याचे समजून पोलिसांना तपासाचा आदेश द्यावा, अशी मागणीही याचिकेत केली आहे.

Web Title: Seven Judge Inquiry Committee Petition High Court