प्राध्यापकांना अखेर सातवा वेतन आयोग लागू 

अरुण मलाणी
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पुण्यासह नाशिक व नगर जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांना जुलैचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार प्राप्त झाले आहे. त्रुटींचा अंदाज घेण्यासाठी सुरवातीला पुणे विभागात आयोगाची अंमलबजावणी यशस्वीरीत्या झाली असून, आता राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांना ऑगस्टचे वेतन आयोगाच्या निकषांप्रमाणे मिळणार आहे. 

नाशिक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पुण्यासह नाशिक व नगर जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांना जुलैचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार प्राप्त झाले आहे. त्रुटींचा अंदाज घेण्यासाठी सुरवातीला पुणे विभागात आयोगाची अंमलबजावणी यशस्वीरीत्या झाली असून, आता राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांना ऑगस्टचे वेतन आयोगाच्या निकषांप्रमाणे मिळणार आहे. 

अकृषी विद्यापीठे, विधी विद्यापीठे, अशासकीय अनुदानित महाविद्यालये, शासकीय महाविद्यालये, विज्ञान संस्थांमधील शिक्षक व समकक्ष कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास 5 मार्चला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. शासनस्तरावरून हिरवा कंदील मिळाल्यामुळे प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची प्रतीक्षा होती. अंमलबजावणी प्रक्रियेत काही त्रुटी आहेत काय, याची पडताळणी करण्याच्या अनुषंगाने सुरवातीला पुणे विभागाची निवड करण्यात आली. त्यानुसार पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यांतील वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासनाने विद्यापीठाकडे पडताळणीची प्रक्रिया राबविली. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या संचालक व सहसंचालकांमार्फत पुढील प्रक्रिया राबविताना जुलैचे सुधारित वेतन तिन्ही जिल्ह्यांतील प्राध्यापकांना प्राप्त झाले. दुसऱ्या टप्प्यात राज्यभरातील अन्य वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांना ऑगस्टपासून सुधारित वेतन प्राप्त होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventh pay commission is applicable to professors