शिकारी नवाबच्या घाईमुळेच 'अवनी'चा बळी! 

Nawab
Nawab

मुंबई : तेरा जणांचा बळी घेतल्याच्या आरोपावरून बंदुकीचा बळी ठरलेल्या "अवनी' वाघिणीला वाचवता आले असते, अशी माहिती पुढे आली आहे. 19 सप्टेंबरला अवनी सहजपणे वन अधिकाऱ्यांकडून जेरबंद झाली असती; परंतु प्राण्यांची शिकार करण्याचा विडा उचललेल्या शिकारी नवाब शफाअतअली खानच्या घाईमुळेच अवनीला जिवंत पकडता आले नाही, अशी तक्रार वन अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केल्याचे सूत्रांनी "सकाळ'ला सांगितले. 

अवनीने 18 सप्टेंबरला गाईची शिकार केली होती. त्याची माहिती मिळताच वन विभागाची पाच पथके अवनीला पकडण्याच्या तयारीला लागली. गाईची शिकार झालेल्या ठिकाणी दोन पशुवैद्यकीय अधिकारी अवनीला बेशुद्ध करण्यासाठी पोचले; मात्र सायंकाळपर्यंत अवनी शिकारजवळ आली नाही. वन विभागाच्या नियमाप्रमाणे सायंकाळनंतर जनावराला बेशुद्ध केले किंवा मारले जात नाही. या नियमाचे पालन करत 18 सप्टेंबरला वन अधिकाऱ्यांनी अवनीला रात्रीचे पकडणे टाळले.

या भागापासून नवाबचे पथक लांब राहणार होते. अवनी शिकार खाण्यासाठी आल्यानंतर सकाळ होताच तिला बेशुद्ध करून पकडण्याची वन विभागाची योजना होती. त्यानुसार नवाबची गाडी मुख्य रस्त्यावर थांबेल, शिकारीजवळ जाणार नाही असे ठरले होते, परंतु अवनीला पकडण्याचे श्रेय मिळवण्यासाठी नबावने गाडी शिकारीच्या समोरच नेऊन उभी केली. पथकाची चाहुल लागल्यामुळे अवनी तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. या घटनेने संतापलेल्या पांढरकवडा विभागाच्या उपवनसंरक्षक के. एम. अभर्णा यांनी याबाबतची तक्रार यवतमाळ प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक पी. जी. राहुरकर यांना 20 सप्टेंबर रोजी केली. याबाबत माहिती घेण्यासाठी राहुरकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

वन अधिकारी व नवाबचा वाद 
अवनीला पकडण्यात नवाब याने वन विभागासमोर उभ्या केलेल्या अडथळ्यांचा पाढाच वन अधिकाऱ्याने पाठवलेल्या पत्रात वाचण्यात आला. याआधीही अवनी सहज सापडली असती; परंतु तिच्याबाबतची माहिती नवाब याने लपवल्याने तिला पकडता आले नसल्याचे तक्रारपत्रात लिहिले आहे. अवनीला ठार करायचे, असे नवाबने ठरवले होते; मात्र सतर्कतेमुळे त्या वेळी अवनीचा जीव वाचला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com