
Nana Patole News : 'अतिशय कमी बुद्धी असलेला प्रदेशाध्यक्ष'; शहाजी बापू पटोलेंवर बरसले!
सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसकडे पद द्यायला माणूस नव्हता म्हणून पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलं असून पटोले हे राजकारणातील अतिशय कमी बुद्धी असणारे नेते असल्याची जहरी टीका देखील शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.
सांगोला येथे शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणा-या बाबूराव गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव सत्काराचा कार्यक्रम आज (८ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
शहाजी बापू पाटील म्हणाले की, सध्या अडचण अशी आहे की, आपल्या मानदेशी भाषेत एक म्हण आहे, ज्याला खालचं वरतं कळत नाही त्याला कारभारी केलं. नाना पटोलेला कोळज कुठे, करगडी कुठे, नारळा कुठे, अकलूज कुठे काही माहिती आहे का? उगं आपलं काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्यायला कुणी माणूस नाही म्हणून याला केलं. हे काही नाही. राजकारणाची अतिशय कमी बुद्धी असलेले सध्या दुर्दैवाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत.
नाना पटोले काय म्हणाले होते
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (स्व.) माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यामुळे सांगोला तालुका सर्वत्र ओळखला जात होता. सध्या मात्र वेगळ्या कारणांनी सांगोला तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. आम्ही मात्र झाडी, डोंगारवाले गद्दार नाही, तर राज्यातील सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी बांधील असणारे महाविकास आघाडीचे खुद्दार आहोत, असा टोला नाना पटोले यांनी नाव न घेता आमदार शहाजीबापू पाटील यांना लगावला होता.