शनी शिंगणापूर मंदिरात महिलांनाही प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - नगर जिल्ह्यातील शिंगणापूर (ता. नेवासा) येथील श्री शनैश्वर देवस्थानात यापुढे महिलांनाही प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई - नगर जिल्ह्यातील शिंगणापूर (ता. नेवासा) येथील श्री शनैश्वर देवस्थानात यापुढे महिलांनाही प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासंदर्भातील विधेयकाच्या मसुद्यास मान्यता देण्यासह आगामी पावसाळी अधिवेशनात विधेयक सादर करण्यासदेखील मंजुरी देण्यात आली.

शनैश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. गर्दीच्या प्रमाणात याठिकाणी सोयी-सुविधा निर्माण करण्यासह कल्याणकारी कार्य करणे आवश्‍यक होते. तसेच यापूर्वीच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी केलेल्या अनियमितता व गैरव्यवहाराबाबत तसेच सध्या नव्याने नियुक्त विश्वस्तमंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत शासनास तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्याचप्रमाणे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या काही घटनाही याठिकाणी घडल्या होत्या. त्यामुळे अस्तित्वातील सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करून नवीन अधिनियमान्वये शनैश्वर देवस्थान राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शनी देवस्थानात यापूर्वी महिलांना प्रवेश नव्हता. मात्र, महिलांच्या प्रवेशासाठी कोल्हापूर महालक्ष्मी अणि शनैश्‍वर येथे मोठी आंदोलने झाली होती. या पार्श्‍वभूमीवर समाजातील भेदाभेद नष्ट करून महिलांनाही प्रवेश मिळण्याबाबत अनेक स्तरावरून चर्चा सुरू होती. यामुळे राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. नव्या कायद्यानुसार नवीन विश्वस्तमंडळ नियुक्त करणे आणि स्थावर व जंगम मालमत्तेचे अधिकार राज्य शासनाकडे राहतील.

इतर महत्त्वाचे निर्णय
- राज्यात नवीन फळबाग लागवड योजना लागू
- कृषि उत्पन्न बाजार समितीमधील ई-ट्रेडिंगच्या नियमनासाठी अध्यादेश
- राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) पोर्टलशी जोडणार
- दुय्यम न्यायालयातील अधिकाऱ्यांना दुसरा राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोग लागू
- वेल्हे तालुक्‍यातील गुंजवणी प्रकल्पास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान
- स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण होणार
- मारुफ करारातील 616 कर्मचाऱ्यांना कालेलकर करारातील तरतुदी लागू

Web Title: shani shinganapur temple women entry