गव्हाच्या आयातीवर शरद पवारांनी सही केली; देशाची ती शेवटची गहू आयात

गव्हाच्या आयातीवर शरद पवारांनी सही केली; देशाची ती शेवटची गहू आयात

शरद पवार साहेबांचा आणि माझ्या वडिलांचा स्नेह फार जुना होता. माझे वडील कै. दत्तात्रय वळसे-पाटील काँग्रेसचे आमदार होते. पुणे जिल्ह्यातल्या राजकारणापलीकडे आमचा कौटुंबिक स्नेह होता. त्यामुळे मी साहेबांना विद्यार्थिदशेपासूनच पाहत होतो. माझं शिक्षण पूर्ण झालं त्या वेळच्या रीतीनुसार चांगलं शिकलेल्या मुलानं नोकरी करावी, असा दंडक होता. मला मात्र राजकारणात रस होता. लोकसंघटन, प्रश्‍नांची सोडवणूक, धोरणात्मक विचार करणं, ह्या सगळ्याचंच मला आकर्षण होतं. पवारसाहेबांची अगदी तरुण वयातली लोकप्रियता आणि प्रगल्भता मोहून टाकत होती. त्यांच्यासारखंच काहीतरी करता यायला हवं असं वाटत होतं. सुदैवानं, मला सुरुवातच त्यांच्या सहवासातून करता आली. त्यांचा सहायक म्हणून काम करताना राजकारणाचा एकूण आवाका, प्रशासकीय कौशल्यांची गरज, धोरणकर्ते म्हणून काम करताना असलेली जबाबदारी ह्या सगळ्याचं अमूल्य शिक्षण मिळालं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांच्या अगदी मनातल्या कप्प्यात असलेले विषय म्हणजे एक, शेती आणि दुसरा, ग्रामीण विकास. त्यासाठी असलेलं सहकाराचं माध्यम. २००४ मध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार, म्हणजे ‘आमचे साहेब’ कृषिमंत्री झाले. सर्वप्रथम साहेबांच्या सहीसाठी फाइल आली, ती परदेशातून गहू आयात करण्याची! सवयीप्रमाणे साहेबांनी फाइल पूर्णपणे नीट वाचून काढली. शेतकऱ्यांचा गहू सरकार ज्या दरानं खरेदी करते, त्यापेक्षा कितीतरी अधिक दर परदेशातल्या शेतकऱ्यांना देऊन गव्हाची खरेदी करण्याचं निश्‍चित करण्यात आलं होतं. फाइल वाचून साहेब प्रचंड अस्वस्थ झाले. पंतप्रधानांच्या विनंतीखातर केवळ साहेबांनी अनिच्छेनंच गव्हाच्या आयातीच्या त्या फाइलवर सही केली. परंतु त्याच दिवशी त्यांनी पक्का निर्धार केला, की ही शेवटची आयात. अन्नधान्य आयात करण्याची वेळ भारतावर येता कामा नये. परदेशातल्या शेतकऱ्यांना वाढीव पैसे देण्यापेक्षा ही वाढीव रक्कम आपल्याच देशातल्या शेतकऱ्यांना दिली, तर ते अधिक धान्य पिकवतील; त्यातून आपली अन्नधान्याची गरज भागेलच, शिवाय शेतकऱ्यालाही चार पैसे मिळतील. त्यांनी अन्नधान्याच्या आधारभूत किमती वाढवून देण्याचा निर्णय घेऊन पुढच्या काळात त्या दुप्पट-चौपट केल्या. एकट्या पंजाब राज्यातील शेतकऱ्यांच्या घरात जास्तीचे आठ हजार कोटी रुपये गेले! हैदराबादमध्ये सर्व राज्यांच्या कृषिमंत्र्यांची पवारसाहेबांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत पंजाबचे त्यावेळचे कृषिमंत्री सच्चासिंग लंघा (जे तेव्हाच्या विरोधी पक्षातल्या अकाली दलाचे नेते) होते. त्यांनी पवारसाहेबांचे जाहीर अभिनंदन करून आभार मानले.  देशाची अन्नधान्याची स्वयंपूर्णता जेवढी महत्त्वाची, तितकीच किंबहुना, त्याहून कांकणभर अधिक शेतकऱ्याची आर्थिक उन्नती महत्त्वाची आहे, असं उत्तर साहेबांनी कृतीतून दिले. त्याचा देशाला लाभ झाला. बहुतेक देशांना त्यावेळी आर्थिक मंदीची झळ लागली असताना भारतात पवारसाहेबांनी जी दुसरी हरितक्रांती साधली, त्यामुळे मंदीची झळ लागली नाही. शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळत राहिल्यामुळे तो बाजारात जाऊन निरनिराळ्या प्रकारचा औद्योगिक माल खरेदी करत राहिला. त्यामुळे उद्योगधंद्यांनाही मंदी जाणवली नाही. इतकंच नव्हे, तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बारामती येथे येऊन ‘दुसऱ्या हरितक्रांतीचे उद्गाते’ ह्या शब्दांत पवारसाहेबांच्या कार्याचा गौरव केला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आदरणीय शरद पवारसाहेब हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. महाराष्ट्राचे गौरवस्थान असलेल्या साहेबांचे मार्गदर्शन व नेतृत्व देशासाठी नेहमीच महत्त्वाचे ठरले आहे. त्यांना आरोग्यदायी व आनंदी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी भावना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो.   
- प्रकाश प्रल्हाद छाब्रिया, फिनोलेक्‍स ग्रुप ऑफ कंपनीज्

देशातील कोणतेच असे क्षेत्र नाही; ज्यात आदरणीय शरद पवार साहेबांनी आपला ठसा उमटविला नाही. त्यांचे हेच कार्यकर्तृत्व त्यांना एक कार्यक्षम नेता बनवते. शेतीपासून आर्थिक आणि  संरक्षण क्षेत्रातील समस्या त्यांनी काळजीपूर्वक हाताळल्या आहेत. त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली देशात आणि राज्यात अनेक आमूलाग्र व सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास अधिक वृद्धिंगत होवो तसेच त्यांना चांगले आरोग्य लाभो, अशी माझी सदिच्छा आहे. 
- किरण ठाकूर, संस्थापक अध्यक्ष, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., सल्लागार संपादक दै. ‘तरुण भारत’, बेळगाव

आदरणीय शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा मी कामास सुरुवात केली. सहकार आणि औद्योगिक संस्थांच्या स्थापनेतून त्यांनी राज्याचा केलेला विकास व तेव्हापासूनचे बदल आम्ही पाहिले व अनुभवले आहेत. शैक्षणिक संस्था, क्रीडा प्रशासन आणि इतर अनेक जबाबदाऱ्यांसह विविध क्षेत्रांत त्यांचा सहभाग आहे. या क्षेत्रातील त्यांची कार्यक्षमता आश्‍चर्यचकित करणारी आहे. त्यांच्यात कमालीची ऊर्जा आहे. मी आशा करतो, की आपण सर्वजण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
- दीपक छाब्रिया, एक्‍झिक्‍युटिव्ह चेअरमन,  फिनोलेक्‍स केबल लिमिटेड

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विकासाची जाण असणारे व शहरी भागातील समस्या समजावून घेत त्यावर तोडगा शोधणारे अतिशय कार्यक्षम नेते म्हणजे शरद पवार साहेब. शहरीकरणाबाबत निमशहरी भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत व मार्गदर्शन केल्याने ‘मगरपट्टा सिटी’सारखे प्रकल्प उभे राहू शकले. आयटी उद्योग पुण्यात आणण्यात त्यांनी हातभार लावला. त्याच्या प्रेरणेतून हिंजवडी आयटी पार्क उभे राहिले. शहरीकरणाला रोजगारनिर्मितीचे पाठबळ आयटी व विविध क्षेत्रांतून निर्माण करण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे राज्याची प्रगती झाली आहे.  
- सतीश मगर, अध्यक्ष, क्रेडाई नॅशनल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com