
Sharad Pawar : सुषमा अंधारेंच्या त्या 'व्हीडिओ'बद्दल विचारताच पवार म्हणाले...
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांबद्दल होत असलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भूमिका स्पष्ट केली. 'त्या सद्गगृहस्थाने काढलेले उद्गगार चुकीचे' असं म्हणून पवारांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध नोंदवला.
मागच्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत भाजपशी संबंधित मंडळींकडून वादग्रस्त विधानं करण्यात आलेली आहेत. यामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड यांचा समावेश आहे.
याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिशी संवाद साधला. पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उदयनराजे यांनी घेतलेली भूमिका चांगली आहे. यात राज्य आणि केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होतोय.
''कर्मवीर भाऊराव पाटलांनी मुलांच्या जेवणासाठी स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातले दागिने विकले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल असं बोलणं चुकीचं आहे.'' असं पवार म्हणाले.
याबरोबर शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांना सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांबद्दल केलेल्या विधानासंबंधी विचारले असता, मी त्यांच्याबद्दल कशाला बोलू... रिअॅक्शन मी द्यायची?... असं म्हणत पवारांनी उत्तर देणं टाळलं.